My Stories

छोट्या पार्टीतला मोठा आनंद

‘ रुपाली ‘ ही माझी कॉलेज फ्रेंड, मी आणि ती ज्युनियर कॉलेज मध्ये एकत्र होतो. डिग्री कॉलेज साठी माझे विद्याविहार येथील के. जे. सोमैय्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले, नंतर जुनियर कॉलेज मधील फार कमी मित्र मैत्रिणी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. पण हल्ली तीन चार वर्षांपूर्वी व्हाट्सअप वर “पराग कॉलेज” नावाच्या ग्रुप मध्ये मी ऍड झालो आणि पुन्हां एकदा इतकी वर्ष लांब असलेली सर्व मित्र मंडळी नव्याने कॉन्टॅक्ट मध्ये जोडले गेलो. तसे लास्ट ईयर रियुनियन सुद्धा झाले होते पण नेमका त्याच दिवशी माझा दुसरा पिकनिक प्लान असल्याने रियुनियन मध्ये जॉईन व्हायचा माझा बेत हुकला, पण तरी व्हाट्सअप ग्रुपवर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो.

गेल्या आठवड्यात मला रुपालीचा फोन आला. अर्थात कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच माझं तिच्यासोबत बोलणं होत होतं त्यामुळे हाय… हॅलो…कसा आहेस !…तू काय करतेस ! वगैरे वगैरे बोलणे झाले आणि मग तिने फोन करण्याचे मूळ कारण मला सांगितले. (सॉरी..कॉलेज नंतर जवळपास दहा एक वर्षानंतर फोन आलेली रुपाली आत्ता काय करते हे तुम्हांला सांगितलंच नाही. तर रुपाली एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे, तीच लग्न झालं असून तिला दोन गोड मुली आहेत.) तिच्या मोठ्या मुलीचा दोन दिवसांनी वाढदिवस आहे असे तिने सांगितले. वाढदिवस एखादया अनाथ आश्रमात साजरा करावा अशी बड्डे गर्लची ईच्छा होती. कॉलेज ग्रुप वर मी वरचे वर प्रोजेक्ट्स बद्दल पोस्ट टाकत असल्याने हॅप्पी वाली फिलिंग उपक्रम आणि माझ्या सोशिअल कामाबद्दल तिला माहिती होती आणि त्यामुळेच तिने माझ्याकडून एखादया अनाथाश्रमाचा नंबर मिळवा यासाठी फोन केला होता. मला ते ऐकून फार बरं वाटलं, मी लगेचच बदलापूर आणि ठाणे येथील दोन आश्रमांचे नंबर तिला मॅसेज केले आणि त्यांच्याशी बोलायला सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी तिचा परत फोन आला, तिने सांगितले तिला एखादी अशी संस्था हवी आहे जिथे लहान मुलीही असतील, कारण मी कॉन्टॅक्ट दिलेल्या आश्रमात फक्त मुलच राहतात. मग असा आश्रम शोधण्यासाठी मी तिच्याकडून ऐका दिवसाचा वेळ मागून घेतला.

दुसऱ्या दिवशी माझा भांडूपमध्ये शालेय साधन सामग्री वाटपाचा कार्यक्रम असल्याने दुपारपर्यंत मी व्यस्तच होतो, त्याच कामात रुजू असताना तिचा मला अचानक फोन आला, तिच्याशी बोलताना मला तिच्या आवाजाचा टोन थोडा बैचेन असल्यासारखा वाटला. तिला बैचेनीच कारण विचारल्यावर मला कळलं कि तिला तिच्या ऐका मैत्रिणीने मुंबईच्या शहरी वस्तीत असणाऱ्या एका अनाथाश्रमाचे कॉन्टॅक्टस दिले होते जिथे मुलीही राहतात आणि शिकतात, त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून रुपाली तसं तर खुश व्हावी असं अपेक्षित होतं पण उलट ती आता बेचैन झाली होती. आता माझ्यासारखेच तुम्हीही विचार कराल नक्की असं काय बोलणं झालं असेल ! तेच सांगतो – रूपालीला वाढदिवसाच्या अवचित्यावर तिच्या मुलीचे वापरात नसलेले पण वापरण्यासारखे कपडे, काही चांगली खेळणी डोनेट करायची होती आणि सोबत खाऊ वाटून मुलांमध्ये वेळ स्पेंड करायचा होता. पण त्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या कपड्यांना साफ नकार सांगितला, आरोग्याच्या दृष्टीने संस्थेच्या नियमावलीनुसार बाहेरचा खाऊ मुलांना देण्यास देखील मनाई आहे. खेळणी आणल्यास प्रत्येक मुलाला /मुलीला मिळतील अशी एकसारखीच आणावीत असे सांगण्यात आले. पण या सगळ्या गोष्टी करणं तिला अवघड होते म्हणून तिने अजून विकल्प विचारला तर संस्थेने सरळ पैसे रुपी ठराविक रक्कमेची मागणी केली, किंवा मग संस्थेतील सर्व मुलांच्या एका वेळच्या जेवणाचा निधी द्यावा असे सांगितले, आणि या गोष्टीसाठी निर्धारित निधीही रुपालीने या कार्यासाठी ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त येत होता. पहिल्यांदा तिने संस्थेचे हे प्रस्ताव तिच्या नवऱ्याला सांगितले, साहजिकच त्यांना ते नाही पटले, कारण जरी आपण निधी नाही दिला तरी ही संस्था मुंबईच्या अगदी मध्यभागी आहे त्यामुळे इथे चांगले डोनेशन्स येतच असतील, त्यामुळे मदत योग्य हातात जावी आणि मुलीचा वाढदिवस फक्त आपल्या मानसिक समाधानासाठी नाही करायचा, तर यातून पुढच्या एखाद्या खरच गरजूला मदत भेटावी अशी त्या दोघांचीही तिव्र इच्छा होती. (शेवटी भिती फक्त इतकीच वाटते कि या संस्थांच्या नियमावलींमुळे किंवा निधी रुपी जाचक अटींमुळे लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांना नकळत फुलस्टॉप ना बसावा..)आता तिला काळजी ही वाटत होती कि आजचा अर्धा दिवस तर निघून गेला, उद्या वाढदिवस तर अश्याच काही पद्धतीत साजरा करायचे प्रॉमिस तिने मुलीला केले होते, पण आता ते प्रॉमिस पूर्ण कसे करणार हे तिला सुचत नव्हते.

क्षणाचाही विलंब न करता मी तिला म्हणालो अजिबात टेन्शन घेऊ नको, रिलॅक्स रहा, कामावरून शांत घरी जा आणि तू ठरवल्याप्रमाणेच वाढदिवस साजरा होईल, मी रात्री फोन करेन. संध्याकाळपर्यंत माझी सगळी कामे आटपून मी घरी पोहोचलो, चहा पिऊन स्कुटीला किक मारली आणि लक्ष्मीचं घर गाठलं. ( लक्ष्मी ही माझी मानलेली बहीण जी आपल्या कुटूंबासोबत घणसोली नोड येथील फुटपाठलागत राहते. आणि लोहार काम करून तिचे कुटूंब आपले उदरनिर्वाह करते.) मी या वेळी दोन आठवड्या नंतर त्यांना भेटायला गेलो असल्यामुळे आधी तर आमच्या बऱ्याचसाऱ्या पेंडिंग गप्पा रंगल्या, यावेळी लक्ष्मीची लहान बहीण अंगावर अंथरून घेऊन झोपली होती, मी आईंना विचारलं बत्तीच्या वेळी ही का झोपले तर आई म्हणाल्या तिला बर न्हाय, मागच्या आठवड्यात मच्छरजाळी फाटली पोरांची आणि रातचं मच्छर लय तरास देत्यात आन पोरं आजारी पडत्यात. ते चित्र पाहून अन त्यांची व्यथा ऐकून मला मनातून फार दुःख वाटलं, पण मी ते मनात लपवत तसच त्यांना धिर देत म्हणालो करू मच्छर जाळीची व्यवस्था लवकरच तुम्ही काळजी घ्या तोवर.मग त्यांना मी वाढदिवसाबद्दलची माझी दुविधा सांगितली, मी काही म्हणावं या आधीच लक्ष्मीनं माझं मन वाचलं आणि लगेच म्हणाली – दादा आरं इथं करू कि बड्डे पार्टी धुमधडाक्यात आपल्या आशियान्यात. मग ठरलं तर उद्या बड्डे इथंच साजरा करायचा.

मी घरी जाऊन रुपालीला फोन केला आणि सांगितलं, वाढदिवसाची धमाल जागा ठरली आहे, पण आता ती सप्राईज आहे, तू फक्त बारा जणांसाठी खाऊ, आठ फूट मच्छरजाळी आणि बड्डे गर्ल ला घेऊन उद्या सकाळी अकरा वाजता घणसोलीला ये. सकाळी अविनाशने ( मेव्हणे कम बेस्ट फ्रेंड ज्यादा ) फुग्याचे पाकीट घेऊन बड्डे लोकेशन ज्या पद्धतीने सजवले होते, त्याला पाहून सिग्नल वर थांबलेली प्रत्येक गाडी विंडो ग्लास खाली करून आमच्या शामियाण्याकडे वळून वळून पाहत होती. आणि मग बड्डे पार्टी सेलिब्रेशनचा जो काही आनंद या डोळ्यात साठवला त्याच वर्णन शब्दात होणे नाही, त्याच पार्टीतले ते सुवर्ण क्षण या व्हिडिओमध्ये टिपले आहेत.

बघा ना…खूप अवघड वाटलेली गोष्ट इतक्या सहज पार पडली, एकीकडे रुपाली अन तिच्या कुटुंबाला हवी होती तशी बड्डे पार्टी भेटली, तर दुसरीकडे लक्ष्मी अन तिच्या कुटुंबाला आमच्या गोड कंपनीसोबत खाऊ आणि मच्छरजाळी भेटली…आणि महत्वाचे म्हणजे सगळ्यांनाच रिटर्न गिफ्ट रुपी भेटली हैप्पी वाली फिलिंग .

मग तुम्ही कधी अनुभवणार अशी Happy wali feeling !

8 thoughts on “छोट्या पार्टीतला मोठा आनंद

    1. जपून ठेवावेत असे आनंदाचे क्षण फार क्वचित असतात. हा आनंद वाटण्यासाठी असतो. स्वतःला मिळणाऱ्या आनंदापेक्षा इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची इच्छा मनात जागी होणं, यापेक्षा जगण्यातली चांगली गोष्ट दुसरी कोणती असणार….?
      खुप छान विजय …..

  1. विजय भावा,
    Social work ही आता तुझी नुसती आवड न राहून ती तुझी ओळख झाली आहे. तुझ्या कामाने तू इतर इच्छुकांनाही या कार्यात सहभागी होण्याचा सोपा मार्ग खुला करून देतो हे कौतुकासस्पद आहे.
    -YAGA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top