My Stories

रायगडावर पाहिलेली वाघिण

तिच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं – हो मी ही येणार आहे रायगडावर राज्यभिषेक सोहळा पाहण्यासाठी. व्हाट्सअप वर लगेच माझ्या या उत्तरावर तिने हसरी स्माईली पाठवली आणि माझा निरोप घेतला. आता फक्त आतुरता होती दोन दिवसानंर होणाऱ्या त्या सूर्योदयाची, अन त्या सुवर्ण किरणांत न्याहून निघालेलं किल्ले रायगडचं ते स्वर्गीय सुख या उघडया डोळ्यांनी अनुभवायची.

जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रायगडावर जाऊन साक्षीदार होण्याचा बेत तर पक्का होताच पण त्याचबरोबर आता मनात उत्सुकता होती बऱ्याचसाऱ्या प्रलंबित गाठी भेटींची ज्या या सोहळ्यानिमित्ते पार पडणार याची मला खात्री होती.

रात्री कार्यालयीन काम आटपून विक्रोळीहून थेट भांडूप स्टेशन गाठलं जेथून मी इतर मित्रमंडळींसोबत नियोजित बस मधून किल्ले रायगडचा प्रवास करणार होतो. थोड्या वेळात सगळे एकत्र भेटलो आणि एकदाचा राजधानी रायगडाच्या वाटेवर आमचा प्रवास सुरु झाला, रात्रभर प्रवासात रंगलेल्या भक्ती आणि शक्ती गीतांमुळे वेळ कसा गेला ते कळालेच नाही. भल्या पहाटेच्या पाच वाजता आम्ही पाचाडला पोहोचलो, या दिवशी बऱ्याचसाऱ्या शिवभक्तांचे रायगडावर येणे होते त्यामूळे पाचाड पर्यंतच मोठ्या गाडयांना अनुमती होती, मग बस मधून उतरून आम्ही पायथ्यापर्यंचे तिन किलोमीटर अंतर पुढील काही वेळात पायी कापले आणि किल्ले रायगड चढाईला सुरुवात केली. रायगडाची प्रत्येक पायरी चढताना एक वेगळेच सुख भेटते मनाला आणि त्यात चिंब पावसाची सोबत म्हणजे सोन्याहून पिवळंच म्हणावं लागेल.

हत्ती तलावाच्या वाटेने पुढे चालत आई शिरकाई देवी मातेचे दर्शन घेतले आणि थेट होळीच्या माळावर जाऊन थांबलो, धुकं थोडं जास्तच असल्यमुळे तिथे नक्की किती संख्या असेल याची कल्पना येत नव्हती मात्र जय जिजाऊ…जय शिवराय हाच जयघोष सर्वत्र घुमत होता आणि त्याच आवाजाच्या दिशेने मी नगारखाना प्रवेश द्वाराकडे चालू लागलो, सभागृहासमोर रयतेच्या राज्याचा अगदी थाटात राज्याभिषेक सोहळा पार पडत होता. यंदाच्या राज्याभिषेकला आत्मिक आंनद हा होता की ,ज्या रायगडाचा अभ्यास गेले अनेक वर्षे करून, ज्याच्या कणकण अभ्यासणारे जेष्ठ इतिहास संकलन श्री आप्पा परब यांच्या हस्ते हा राज्याभिषेक होत होता.

कल्पने पलीकडच मिळणारं ते नयनरम्य सुख डोळ्यात साठवत असताना तेव्हाच अगदी माझ्या डावीकडून काही फुटाच्या अंतरावरून वीज लवलवावी तशी भरधाव वेगात लुगड्याच्या पोशाखात ती त्या गर्दीत सर सर पुढे सरकु लागली, तिरक्या बाजूने माझी नजर तिच्या कपाळावर कोरलेल्या त्या चंद्रकोरीकडे गेली, ज्याची छाप अजूनही अंतर्मनाच्या गाभाऱ्यात जशीच्या तशी उमटली आहे, तीच चालणंच इतकं वेगवान होतं कि क्षणभरासाठी वाटलं ही जर धाऊ लागली तर एखाद्या बेलगाम आश्वालाही हसत हसत मागे पाडेल. त्या गर्दीत तिला गाठण्यासाठी मी ही मग माझा वेग वाढवला अन तिच्या पैजनांच्या आवाजामागे वाट काढू लागलो. काही अंतरावर जाऊन अखेर पाठशिवणीचा तो डाव संपला अन समोर तिला मी पाठमोर उभं पाहिलं, धापा टाकत मी ही थोडा स्थिरावलो, इतक्यात माझी नजर बाजूला उभ्या असलेल्या तिच्या माऊलींकडे वळाली आणि त्यांनीही त्याच क्षणाला मला पाहिलं अन त्यांच्या गालावर एकच स्मितहास्य उमटलं. आजवर ज्यांचा आवाज नुसता फोनवर ऐकला होता, त्या माऊलींच्या डोळ्यातलं तेज पाहून त्यांची मला ओळख पटली. दुसऱ्या क्षणालाच नतमस्तक होऊन माझा हात त्यांच्या पायांशी गेला अन त्यांनी डोक्यावर हात ठेवत यशस्वी भव असा आशिर्वाद दिला,आणि अगदी तेव्हाच तिची नजर माझ्याकडे वळाली अन मी अगदी तिच्या समोर कमरेवर दोन्ही हात घेऊन उभा राहिलो. तिच्या डोळ्यात माझ्या भेटीचा तो आनंद स्पस्ट दिसत होता, खुदकन गालात हसून ती म्हणाली

ती : दादा…शेवटी आपली भेट झालीच म्हणायची तर.
मी : रायगडावर भेटू म्हणालो होतो ना !
ती : दादा, राव लय दिवसांपासून इच्छा होती तुम्हांला भेटायची.
मी : माझीही बरका…खूप मोठी हैप्पी वाली फिलिंग भेटली…. वैष्णवी कुठे दिसत नाही?
ती : दादा ही काय समोर.
( आत्तापर्यंत जीच नाव नमूद केलं नव्हतं ती “आकांक्षा” आणि तिची बहीण म्हणजे “वैष्णवी”, या दोघी कोल्हापुरात राहणाऱ्या दुर्गवीर संस्थे अंतर्गत किल्ले संवंर्धन कार्यात कार्यरत, मैदानी खेळात प्रारंगत अश्या बहुगूणी सक्ख्या बहिणी. आणि आवर्जून सांगायचं झालं तर आमच्या फेसबूकच्या मैत्रीची आज इथं रायगडावर पहिल्यांदा फेस टू फेस भेट झाली.)
वैष्णवी : दादा राव कसले भारी बोलता तुम्ही युट्यूबमधल्या प्रत्येक व्हिडिओत.
मी : ऐका मिनिटासाठी मी ओळखलंच नाही बघ तूला, फोटो अन प्रत्यक्ष बघण्यात किती फरक वाटतोय.
( इतक्यात त्या घोळक्यातून कोणी तरी ओरडून सांगितलं, मर्दानी खेळ मंडळी पालखी पुढे चला )
ती : दादा चलताय ना सोबत !
मी : हो..चला निघुया.
( तिथून निघताना भेटीची आठवण म्हणून आवर्जून मी एक सेल्फी घेतला आणि तिच्या आईनं माझं अन माझ्या टीम हैप्पी वाली फिलिंगच तोंडभरून कौतुक केलं. )

राज्यभिषेकानंतर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जगदीश्वराच्या मंदिराकडे होते, अन या दरम्यान तिथल्या प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनाला भिडलेला असतो. आत्ता ढोल ताशाचा ताल घुमू लागला, त्यावर कित्त्येक हातांचा अन पायांचा ठेका जुळून येऊ लागला, त्यात तेजस्वी भगवे आसमंती झळकू लागले, झेंडूच्या फुलांचा पावसाच्या सरींसोबत मिसळून एकच वर्षाव सुरु झाला, तुतारीचा नाद जोरात घुमला अन मोठ्या थाटात महाराजांची पालखी नागरखान्याच्या द्वारातून पुढे निघाली. होळीच्या म्हाळावर पोहोचताच तीने तिच्या गटातील सर्वांसोबत रिंगण धरले.
आता त्या रिंगणाच्या ती बरॊबर मध्य भागी ऊभी होती, तिच्या हातात नंगी तलवार, डोक्यावर बरसणारी पाऊसाची ती बेभान धार, ढोलांचा तो बेधुंद नाद, आणि सर्वत्र एकच जल्लोष. अशात तिन बेंबीच्या डेटापासून आवाज काढत शिवगर्जना केली. त्या वेळात काही फुटांच्याच अंतरावरून माझं संपूर्ण लक्ष तिच्या डोळ्यात होतं, ऐक वेगळीच तेजस्वी चमक त्यात दिसत होती, अजिबातच अतिशयोक्ती करत नाही पण त्या ढोल ताश्यांच्या आवाजालाही चिरणारा तिचा तो आवाज मला एखाद्या वाघिणीच्या डरकाळी सारखा भासत होता. अन यानंतर पुढच्या काहीच क्षणात त्यांनी जो मैदानी खेळांचा रोमांचित थरार सादर केला, तो पाहताना तिथला प्रत्येकजण अवाक झाला होता. मग त्यात लाठी काठीचा खेळ दाखवण्यात आला, तालवारबाजीच प्रात्यक्षिक सादरीकरण झालं, आणि विशेष लक्षवेधी बाब म्हणजे दानपट्टयाच्या सलग सात घावात पायाखालील बटाट्याचे एकाच वारात दोन तुकडे करण्यात आले. या संपूर्ण सादरीकरणात गटातल्या प्रत्येक हिरकणीच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास होता त्याला तोडच नाही राव.

यानंतर पालखीसोबत पुढे सरकत हा अखंड रोमांच डोळ्यात साठवत, काही अपेक्षित तर काही अनपेक्षित झालेल्या सुखद गाठी भेटी अनुभवत आम्ही मऊ धुक्यानं कुशीत घेतलेल्या त्या अवघ्या जगाच्या ईश्वराचं मंदिर गाठलं, तिथून मग माझ्या राज्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, आता या किल्ले रायगड नावाच्या स्वर्गातून पुन्हा जमिनीवर जावं लागणार या विचाराने मन जड झालं होतं अन अश्याच जड मनानं वाघ्याचाही निरोप घेत पुन्हा एकदा अलिप्त झालेल्या गटातले माझे मित्र शोधण्याची मी धडपड सुरु केली, अन परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. ( वाघ्या हा महाराजांचा वफादार श्वान – इतिहासात असे म्हटलं गेलंय की शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा वाघ्यानं त्या आगीत उडी घेतली होती.)

या एकंदर भेटीत माझं अन तिचं मोजून दोनचं मिनिटांचं प्रत्यक्ष बोलणं झालं, पण आत्ता रायगडावर पाहिलेली ती वाघीण अन राज्यभिषेक सोहळारूपी सुवर्णसुख असं आयुष्य नावाच्या पुस्तकात ऐक खास पान कायमस्वरूपीसाठी लिहलं गेलंय.

12 thoughts on “रायगडावर पाहिलेली वाघिण

 1. अप्रतिम सोहळा…आणि तितक्याच छान पद्धतीने केलेले चित्रीकरण मनमोहक सोहळा हृदयात साठवून ठेवावा असा….विजुदादाचा गोड़ आणि आपलासा वाटणारा आवाज….नयनरम्य वातावरण ….आणि हॄदयाच ठाव घेणारा जयघोष….मर्दानी खेळ आणि ढोल ताशाचा अचूक मेळ…..धन्यवाद विजुदादा …जय शिवराय

  1. खुपच छान
   जिवनात येऊन एकदा तरी रायगडावरील माती कपाळी लागली तर प्रत्येक माणसाच्या जिवनाच सार्थक होत
   जय भवानी जय शिवराय

 2. पूर्ण राज्याभिषेक सोहळा आणि अक्षु आणि वैष्णवीचा तो वीरागंणा अवतार डोळ्यासमोरून गेला… आता आपली भेट परत कधी होणार ☺️
  सुंदर वर्णन विजय..
  असंच लिहीत रहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top