Uncategorized

हैप्पी वाली होळी

चला होळीच्या रंगात थोडा आनंद मिसळूया, यंदाची होळी हैप्पी वाली होळी पद्धतीने साजरी करूया. हे या नवीन उपक्रमाचे ब्रीदवाक्य.

आत्ता तुम्ही विचार करत असाल नक्की काय होता हा उपक्रम, तर उपक्रमाची संपूर्ण माहिती देतो. आपण सगळे सण किंवा समारंभ आपल्या मित्र परिवार, नातेवाईकांसोबत सहकुटुंब साजरे करतो, पण मनात आलं ज्यांच्या नशिबात दुर्दैवाने कुटुंबाचे प्रेमच नाही अश्यांसोबात आपण होळीच्या पुरणपोळीचा गोडवा वाटला तर किती बरे होईल. आणि मग या विषयावर अनुसरून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि माझ्या Youtube चॅनेल वर उपलोड केला. तसेच फेसबुक वर एक पोस्ट टाकली आणि त्यात जास्तीत जास्त लोकांनी यंदाची होळी अनाथ आश्रम / बालक आश्रम किंवा वृद्धाश्रमात साजरी करावी आणि तिथल्या प्रत्येकाच्या जीवनात आनंदी रंगाची उधळण करावी असे निवेदन केले.

मी यानंतर टीम आणि कुटुंबासोबत होळी साजरा करण्यासाठी बदलापूर येथील सत्कर्म बालकाश्रमाची निवड केली. त्या संस्थेचे मकरंद वाढवेकर यांसोबत फोनवर बोलून मी त्यांना माझी हैप्पी वाली होळी संकल्पना सांगितली, त्यांनाही ती खूप आवडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मला होकार दिला. मग काय ऐन धुळवडीदिवशी हैप्पी वाली होळीचा मुहूर्त पक्का केला आणि टीम सोबत लागलो कामाला. यासगळ्यात सोशिअल पोस्ट वर देखील लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत होत्या, ज्यामुळे एकंदरीत तयारीला चांगलंच प्रोत्साहन मिळत होते.

बघता बघता धुळवडीचा दिवस उजाडला आणि मी माझ्या संपूर्ण टीम आणि पोस्ट मुळे तयार झालेल्या नवीन चार मित्रांसोबत आश्रम गाठला. मुलांना उपक्रमाची माहिती बहूधा आधीच तिथल्या पदाधिकाऱ्यांकडून मिळाली असावी त्यामुळे आमची गाडी आवारात आलेली पाहून मुलं पळत गेट वर आली त्यांच्या डोळ्यातला अबोल आनंद अगदीच वाचता येईल इतक्या प्रखरतेने जाणवत होता. पण आम्ही सगळे नवीन असल्याने त्यातले कोणी पुढाकार करत नव्हते. दबक्या पावलात त्यांची एकमेकांशी कुजबुज चालू होती.
पण आम्ही पण पूर्ण तयारीने गेलेलो त्या चिमुकल्यांना आपलंस करायचं म्हणजे त्यांच्याशी मैत्री करायला हवी याचा अभ्यास आम्ही आधीच केला होता. मग गाडीतून पहिल्यांदा मी माझा मुलगा आणि माझा मित्र विशाल याचा भाचा यांना पुढे केले. या दोन छोट्यांशी त्या सगळ्यांनी पुढच्या पाचचं मिनटात गट्टी केली आणि त्यांच्या मागोमाग आमच्या बरोबर देखील मैत्री जमली.

आश्रमात अजून एक ग्रुप आला होता ज्यांनी मुलांच्या सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यांचा नाश्ता होईपर्यंत आम्ही एका बाकड्यावर भांड्यांमध्ये सुक्या रंगाची आरास लावली आणि आश्रमाच्या म्युझिक सिस्टिमला उडत्या गाण्यांनी भरून नेहलेला पेनड्राइव्ह जोडला. गाण्यांची धून ऐकून बच्चा कंपनी नाश्ता संपवून मैदानात हाजीर झाली आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली, सगळे चिमुकले बेसावध असताना आम्ही नैसर्गिक सुक्या रंगानी धुळवड सुरू केली आणि विशेष म्हणजे मुले पण त्या माहोलात लगेच मिसळलीत. मग पुढचे एक ते दीड तास आम्ही जो काय बेधुंद आनंद लुटला त्याला तोडच नाही. मग या आनंदात बच्चा पार्टीसोबत संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक इतकंच काय तर तिथे साफ सफाई करणाऱ्या मावशी तसच सेक्युरिटी मामा यांनी पण गाण्याच्या ठोक्यांवर ताल धरला. या सगळ्यात आमचा डोळा चुकवून मुलांनी फुगे आणि पिशव्या आणून आमच्यावर निशाणा साधला, पण पिशवी फुटली नाही तर ती लागते आणि त्यामुळे दुखापत होऊ शकते असे समजावून सांगितल्यावर त्यांनी पिशवी बंदी मान्यही केली. आणि मग पुढे किती तरी वेळ नाच गाणे, रंग, फुगडी खूप सारी नौटंकी ही मज्जा चालू होती.

अगदी नाचून दमायला झाल्यावर आम्ही विश्रांती घायचे ठरवले, इतक्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांना हातवार्यांचा काही इशारा केला आणि मुलांनी लगेच साफ सफाई मोहीम सुरू केली. आश्रम परिसरातला केर कचरा पुढच्या दहा मिनटात गोळा करण्यात आला. त्या मुलांना साफ सफाईत लागलेलं पाहून आमची टीम सुद्धा त्यांच्या सोबत त्या कामात रुजू झाली. त्या नंतर मैदान परिसरात असलेल्या नळाखाली मुलांनी हात पाय स्वच्छ केले आणि मग मुलांमध्ये बिस्कीट पुडे वाटप करण्यात आला. अगदीच अतिशयोक्ती करत नाही पण मला स्वतः ला तिथल्या सहा मुलांनी आपल्या हातातले बिस्कीट चारले आणि माझ्या टीम मधल्या प्रत्येकाचा असाच काही अनुभव होता. म्हणजे अर्ध्या दिवसाच्या त्या ओळखीत मुलांनी आम्हांला आपलं मानून त्यांच्या घासातला घास चारला होता, या पलीकडचा आनंद तो दुसरा काय असू शकतो.

थोडी पोटपूजा झाल्यावर आम्ही पुन्हा धमाल मस्ती चालू केली, मुलांसोबत काही खेळ घेतले त्यात बच्चा पार्टीचा चांगलाच व्यायाम झाला. नंतर मैदानातल्या त्याच नळाखाली आंघोळीपूर्वी मुलांच्या अंगावरचा रंग काढून एक एकाला बाथरूम मध्ये आंघोळीसाठी रवाना केले.
सगळी बच्चा कंपनी भोजनालयात येई पर्यंत आम्ही देखील फ्रेश झालो, मुलांच्या खास जेवणाची व्यवस्था आम्ही केली होती, मग सगळ्यांनी एकत्र मिळून गोड पोळ्यांचा गोडवा आनंदाने खाल्ला आणि शेवटी मनात नसताना आम्हांला त्यांचा निरोप घ्यावा लागला.
आमची टीम गाडीत बसताना मुलं हळू हळू गाडीजवळ आली आणि भावुक नजरेने एकटक आमच्याकडे पाहत होती. त्यांच्या मनातली घालमेल आमच्या प्रत्येकाला त्यांच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होती, त्यांनी काही बोलावं या आधीच मी त्यांना म्हणालो, ” ओय कार्टून गँग.. असं तोंड पाडू नका…आम्ही प्रत्येक महिन्यात तुमच्यासोबत होळी खेळायला येऊ. ” इतकं ऐकून त्या प्रत्येकाच्या चेहेऱ्याव खुदकन हसू उमटले आणि आम्ही तिथून निरोप घेतला.

संपूर्ण दिवस या धमाल मस्तीत कसा गेला हे कळालच नाही. दिवसभर व्हाट्सअप आणि फेसबुककडे विशेष लक्ष गेले नव्हते, गाडीत मग म्हणलं चला फेसबुक चाळावे आणि ते उघडताच मला हैप्पी वाली फीलिंग नोटिफिकेशन आले. माझ्या युट्युब आणि फेसबुक निवेदनाल मान्य करून श्रीराम काळे यांनी शेगाव मधील गतिमंद मुलांच्या शाळेत, तर गोवर्धन पाटिल यांनी येवले येथील कर्णबधिर मुलांच्या शाळेत आणि राहूल पारधी यांनी पालघर मधील अनाथ आश्रमात हैप्पी वाली होळी उपक्रम तिथल्या चिमुकल्यांसोबत राबवला आणि त्यांचे फोटो, व्हिडीओमध्ये मला सामायिक केले होते. आत्तापर्यंतचा हा सगळ्यात जास्त आनंदी क्षण होता हा माझ्यासाठी.

मित्रांनो तर आजवर तुम्ही सोशिअल मीडियाच्या गैर वापराबद्दल बरेचसारे लेख वाचले असतील, पण हा ब्लॉग इथं पर्यंत वाचून झाल्यावर तुम्हाला कळालेच असेल हैप्पी वाली होळी मुंबईबाहेर देखील साजरी झाली याचे मुख्य कारण म्हणजे सोशिअल मीडियाचं. आणि हा माझा पहिला उपक्रम नसून या आधीही प्रोजेक्ट वॉर्म विशेस माध्यमातून माझ्या टीम हैप्पी वाली फीलिंगने या थंडीत संपूर्ण मुंबईत उघड्यांवर राहणाऱ्या गरजूंमध्ये एक हजाराहून जास्त चादर आणि ब्लँकेट्स वाटले होते. सांगायचे तात्पर्य म्हणजे लोक आज फेसबुक युट्युब यासारख्या सोशिअल माध्यमांकडे फक्त्त करमणूकिचे साधन म्हणून न पाहता सामाजिक जागृती आणि त्यासंबंधित उपक्रमाकडेही वळू लागलेत. दुसऱ्या प्रोजेक्टला देखील मिळालेले यश आणि वाढलेल्या मदतीच्या हातांमुळे आता उत्साह आणि विश्वास अजून दुप्पट झाला आहे आणि असे हे कार्य अजून जोमाने करायचा हुरूप आलाय.

शेवटी इतकंच सांगेन, आयुष्य खूप सुंदर आहे ते दिलखुलास जगा…कोणत्याच गोष्टीत मन मारू नका, नेहमी सकारात्मक रहा, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद लुटा. आणि आयुष्यात एकदा तरी दुसऱ्याच्या आनंदाचं कारण होऊ पहा.

9 thoughts on “हैप्पी वाली होळी

  1. खूपच छान उपक्रम आहे. अनोखी होळी उत्सव……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top