Uncategorized

काजल…राधा…टायगर आणि #happywalifeeling

फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच यंदाची शिवजयंती पुलवामा येथील हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या शुरविरांना आदरांजली बहाल करण्यासाठी “केंद्रीय राखीव पोलिस बल” जवानां सोबत साजरी करायची हे तर ठरलेलंच पण या एकंदरीत प्रवासात न ठरलेलं पण मनाला अगदीच सुखावून जाणार इतकं असं काही घडेल याची मला अजिबातच कल्पना नव्हती. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व मित्रांनी तळोजा आर. पी. ए. कॅम्प ते भांडूपचे अंतर पायी दौडत गाठले. सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही दौड निर्धारित थांबे घेत दुपारी दोन वाजे पर्यंत भांडूप कोकण नगर- जिथे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तिथे पोहोचली. अर्थात उन्हाच्या झळा खूपच प्रखर असल्याने फार उकाडा होत होता. दौडीत सहभागी झाल्याने आधीच खूप घाम आला होता आणि त्यात ऊनामुळे बसचा पत्रा पण खूप गरम झालेला, इतक्या गर्मीत काही क्षणासाठी बस मध्ये बसने अगदीच असहय झाले, म्हणून मुद्दाम खडीमशीन या जागी असणाऱ्या थांब्या दरम्यान मी बस मधून खाली उतरलो. समोरच असणाऱ्या दुकानातून एक थंड पाण्याची बाटली घेतली आणि रस्त्या पलीकडे असलेल्या बेस्ट बसस्टॉपच्या बाकड्यावर सावलीत जाऊन मोकळा श्वास घेतला.

बाटलीचे झाकण खोलून घोटभर पाणी प्यायलो, तितक्यात माझी नजर कोपऱ्यावर खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांकडे पडली, त्यातली मोठी ज्या पद्धतीने छोट्या मुलीची खेळताना काळजी घेत होती ते पाहून मी डोक्यताच तर्क बांधला बहुतेक या बहिणी असाव्यात. मोठ्या बहिणीने लहान बहिणीला तिच्या पायांच्या अंगठ्यावर ऊभे केलेले आणि घुडघ्याच्या जोरावर स्वतः बाकड्याव बसून छोटीला झुल्यासारखे झुलवत होती. तिच्या प्रत्येक गिरकीत छोटीच्या गालावर लाखमोलाचे हसू उमटत होते. मी बाकड्याच्या एका टोकाला आणि त्या दोघी बाकड्याच्या दुसऱ्या टोकाला असल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते, पण त्यांच्या हसण्याच्या त्या निखळ आवाजाने आता होणाऱ्या गर्मीच्या त्रासाचा मला पूर्णतः विसर पडला होता.

हे असं इतकं गोड नातं आणि तो खेळ मी लांबून पाहत होतो, तेव्हाच अचानक एक कुत्रा बाकड्यावर माझ्या अगदी बाजूला येऊन बसला. आणि त्याला तिथे बसलेलं पाहून त्या दोघीजणी चाललेला खेळ अर्ध्यात सोडून लगेच कुत्र्याजवळ आल्या. म्हणजे आतापर्यंत त्या दोघींचा चेहेरा बघण्यासाठी माझी धडपड चाललेली आणि आता त्या दोघी चक्क माझ्या समोर उभ्या होत्या. त्यातल्या मोठीने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेला, रंग गव्हाळ आणि डोळ्यात एक वेगळंच चैतन्य. तर छोटीने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि रंगीबेरंगी पायजमा घातलेल्या ज्यावर फुलांची नक्षी होती, केसांचा बॉयकट आणि चेहऱ्यावर एक वेगळाच खोडकरपणा.

अलगद एखाद्या बाळाला उचूलन घ्यावं तसं मोठ्या चिमुकलीने त्या कुत्र्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतले. मी तर ते पाहून अगदीच अवाक झालो आणि कुतूहलाने तिच्याचकडे नीट पाहू लागलो. मग फ्रॉकचे एक टोक हातात घेऊन ती त्या कुत्र्याच्या नाकावर पुसू लागली. ती नक्की काय करते हे कळत नव्हते, पण थोडं सरळ पाहिल्यावर कळालं कि त्या कुत्र्याच्या नाकाला लागलेला रंग ती साफ करते. आता हे दृश्य पाहून मन इतकं सुखावले कि काही विचारू नका. मला राहावलं नाही आणि मी लगेच तिला विचारलं…तू नक्की काय केलंस? पण मी पडलो अनोळखी, माझा प्रश्न ऐकून ती परत बाकाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बसली. मला काहीही करून त्या दोन चिमुकल्यांशी मैत्री करायची होती कारण का कुणास ठाऊक त्यांच्याशी बोलणं करून मला खूप सरी #happywalifeeling मिळेल असं अगदी मनापासून वाटतं होते. पण हे वाटतंय इतके सोपे नव्हते कारण मी आधीच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आणि तो असफल झाला होता.

आपलं रक्तच B पॉसिटीव्ह मग इतक्या लगेच हार कशी बरी मानायची !. तसं खिशात एक चॉकलेट होतं पण बस स्टॉपवर माणसांची वर्दळ होती, कोणी मला त्यांना चॉकलेट देताना पाहून गैरसमज करून चॉकलेट देऊन पोरं चोरणाऱ्या गँगचा मेंबर समजून उगीचच चोप देईल याची भिती. तरी मी एक युक्ती लढवली आणि रस्ता क्रॉस करून पुन्हा ज्या दुकानातून पाणी बाटल घेतलेली तिथे जाऊन एक बिस्कीटचा पुडा विकत घेतला आणि परत त्या बाकड्यावर येऊन त्या कुत्र्यासमोर तो खोलून ठेवला, मोजून पुढच्या दोन मिनिटातच त्याने तो फस्त केला आता माझी-त्याची मस्त गट्टी जमली आणि मी त्याला गोंजारत बसलो आणि तोही माझ्याबरोबर मस्ती करू लागला अक्षरशः माझ्या मांडीवर उड्या मारू लागला. आमची ती मस्ती पाहून त्या चिमुकल्या माझ्या जवळ आल्या आणि मला कळालं कि माझी युक्ती कामी आली आहे, लगेचच मी पुन्हा त्यातल्या मोठीला तोच प्रश्न केला.

मी : थोड्या वेळापूर्वी तू काय केलेस?
ती : त्याच्या नाकावर लागलेला रंग साफ केला.
मी : या कुत्र्याला तू ओळखतेस? ती : हो…तो आमचा कुत्रा आहे…टायगर.
मी : तो रंग तू का साफ केलास?
ती : निशब्द ( तिने टायगर ला जी मदत केली होती ती तिला सरळ शब्दात सांगताही येत नव्हते पण तिचे डोळे सारे काही सांगून जात होते )
मी : तुझं नाव काय?
ती : काजल.
मी : आणि या छोटीचे
ती : राधा
मी : शाळेत जाता का तुम्ही?
ती : हो…अहिल्या विद्यालय.

इतक्या कमी वेळात आमची इतकी चांगली मैत्री झाली कि काही विचारू नका, मी अगदी लहान होऊन त्यांच्यासोबत खूप खोडकरपणा अनुभवला त्यात अधून मधून टायगर आमच्या अंगा खांद्यावर उड्या मारत होताच. मी त्या ठिकाणी बराच वेळ घालवलाय आणि माझे मित्र, बस तिथून निघून गेलेत हे मला माहित होते, पण तिथून निघायचे देखील मन होत नव्हते. पण तरी मनाला आवर घालून मी त्यांना निरोप द्यायचे ठरवले, पण निघता निघता थोडी थट्टा मस्करी करावी आणि त्यांना तिथून हसवून निघावे या उद्देशाने मी त्यांना सहज विचारले..

मी : मला खूप आवडला तुमचा टायगर.. मी घेऊन जाऊ का याला माझ्या सोबत.
राधा : हो
काजल : नको…पप्पा ओरडतील तुम्हांला?
मी : पप्पा का ओरडतील?

आणि यानंतर मी जे उत्तर ऐकले ते अजिबातच अनपेक्षित पण विलक्षण गोड होते.

काजल : पप्पांनी टायगर ला भाऊ मानलंय.
मी : (आश्चर्यचक्कीत होऊन )भाऊ… केव्हापासून
ती : तो लहान होता तेव्हापासून.

जगा वेगळ ते कुटुंब आणि तितकेच वेगळे त्या चिमुकल्यांचे संस्कार आणि त्यांना घडवणारे माता पिता… खूप धन्य वाटलं. आजच्या या मतलबी दुनियेत चक्क कुत्र्याला भाऊ मानणारे काजलचे वडील आणि तिच्या कळत नकळत प्राणी मैत्रीचे अन काळजीचे तिच्यावर घडणारे संस्कार पाहून मन भारावून गेले.

तिच्या या वाक्यावर बोलण्यासाठी माझ्या ओठांवर काहीच शब्द नव्हते, फक्त्त मनात खूप सारा अभिमान होता ते ही तिच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल, जे माझ्या गालावरचे हसू बनून उमटले. आणि हसतच मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. वेळे अभावी मला तिथून निघावे लागले पण निघताना मी त्या चिमुकल्यांना प्रॉमिस मात्र नक्की केले कि आता यापुढे त्यांना आणि टायगरला भेटायला मी महिण्यातून एखाद दुसरी चक्कर नक्की त्यांच्या मुक्कामावर मारेन आणि आवर्जून पुढच्या भेटीला पप्पांची भेट घेईन.

शेवटी इतकंच सांगेन आयुष्य फार सुंदर आहे…फक्त्त छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारा मोठा आनंद लुटता आला पाहिजे.

5 thoughts on “काजल…राधा…टायगर आणि #happywalifeeling

  1. विजय भावा,
    फारच छान, तुला मैत्री करण्याची आवड तर आहेच. पण तू अगदी निर्भीडपणे कुणालाही approach करतोस हा गुण त्यामध्ये भर घालते. पुन्हा तुझे प्राणिप्रेम सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. इतर लोक ज्या कडे दुर्लक्ष करतात तेथेही तू सहजपणे धडक देतो. Actualy किमान माझ्यासाठीतरी हे कठीण आहे. कारण बहुतेक लोक आजूबाजूला बघतात, पण जाऊ देना आपल्याला काय घेणं आहे म्हणून बाजूला होतात. आणि नेमकं तिकडेच तू डोळसपणे happywali feeling शोधून काढतोस, simply great man.
    ह्या video मध्ये त्या भाबड्या काजलला कळत सुद्धा नव्हतं ती काय करतोय. पण तू ते हेरलंस आणि धन्यवाद आमच्या सोबत share केलस. ती tiger च्या तोंडावरचा colour साफ़ करून त्याला मदत करत होती. तिला सांगताही येत नव्हत पण तिच्यात अजाणतेपणी आलेला चांगुलपणा तू video त टिपलास. खरंच मस्तच.
    तू खूपच social आहेस, आणि त्यामुळेच तू सर्वांना आपलं करतोस, आणि काजल प्रमाणेच लोक तुला पुन्हा भेटण्याची इच्छा ठेवतात.
    -YatishG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top