My Stories

आमची लोककला ” टिपरी “

टिपरी म्हणलं तर फक्त्त तीन अक्षरांचा एक छोटासा शब्द, पण या एका शब्दात लोककलेचा खूप व्यापक प्रकार सामावलेला आहे, जो आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने अगदी मनापासून जोपासला जातोय.

सातारा भागातील बहुतेक मंडळीना हा प्रकार चांगलाच माहित असेल, कारण या भागातील गावांमध्ये हा प्रकार खूप खेळला जातो. पण ज्यांना हा प्रकार माहित नाही त्यांना खेळाची संक्षिप्त माहिती सांगतो. टिपरी हे एक प्रकारचे पारंपरिक नृत्य आहे जे हलगीच्या ठोक्यांवर खेळेले जाते. हलगी ही चामड्याची बनलेली असून तिचा आकार काहीसा डफली सारखा असतो. हलगी वाजवणारा वादक मधोमध ऊभा राहतो आणि त्याच्या भोवताली रिंगण करून इतर मंडळी दोन्ही हातात टिपऱ्या घेऊन वाजवल्या जाणाऱ्या हलगीच्या ठोक्यांवर ताल धरून विशिष्ट पद्धतीने नाचतात. टिपऱ्या म्हणजे मानग्याची दांडक, साताऱ्याकडे मानगा नावाने ओळखला जाणारा झाडाचा प्रकार इतर बऱ्याच भागात बांबू या नावाने संबोधला जातो. खेळाची सुरुवात ही संत ठोक्यांनी आणि धीम्या नृत्याने होते, हळू हळू ठोक्यांचा वेग वाढू लागतो आणि त्याचबरोबर नाचणाऱ्या मंडळींची गतीदेखील वाढू लागते. हा विशिष्ट नाच खेळणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या समोर असणाऱ्या साथीदारासोबत एकतालात निभावायाचा असतो, त्यामुळे तो संपूर्ण लक्ष केंद्रीत करून खेळावा लागतो. जर तुम्ही साथीदारासोबत एकताल ठोका चुकलात तर तुम्हांला रिंगणातून बाहेर पडावे लागते, म्हणजेच तुम्ही एक प्रकारे बाद होता. पण खेळ मात्र पुढे तसाच चालू राहतो आणि एक एक जण त्यातून बाद होत जातो. या खेळत एक म्होरक्या असतो जो कि ठेका बदलायचा असेल तेव्हा जोरात आवाज देतो आणि त्याच्या आवाजावर सगळी मंडळी ठेका बदलत असतात. ठेका विशिष्ट पद्धतीने गोल फिरून बदलला जातो, गावी या फिरण्याला गिरकी असं म्हटलं जातं. टिपरीचे वेगवेगळे डाव होतात, प्रत्येक डावात वेगवेगळ्या ठेक्यात नृत्य सादर केलं जातं, पण बाकी नियम मात्र एकसारखेच असतात.

गावी टिपरीचे डाव तासंतास रंगतात, काय वेगळाच थाट आहे लोककलेतील टिपरी या प्रकाराचा. गणपतीची मिरवणूक असो, यात्रेतला छबिना असो, वा एखादं लग्नकार्य असो, टिपरी शिवाय कुठल्याच कार्यक्रमाला रंग चढत नाही. आमच्या गावी येणाऱ्या नवीन नव्हरीच आणि वऱ्हाडी पाहूणे मंडळींचं स्वागत आम्ही याच खेळाने करतो. आधी लेझीम आणि मग टिपरी, दारातल्या लग्नात हे समीकरण ठरलेलं. काय वेगळाच जल्लोष आणि उत्साही वातावरण होऊन जातं टिपरीचा डाव रंगताना ते काही विचारूच नका.

टिपरी उद्या खेळायची असेल तर त्याची तयारी एक दिवस आधी पासून करावी लागते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळात लागणाऱ्या टिपऱ्या तोडण्यासाठी ठराविक माणसांची तुकडी करून मानग्याचे बेट असलेली जागा गाठावी लागते. आणि मग सगळे बांबू पडताळून त्यातल्या त्यात मजबूत असणारे बांबू तोडावे लागतात, कमकुवत बांबूचा या खेळात लगेच चुरा होतो म्हणून लागणारे बांबू हे मजबूतच असावे लागतात. हलगी वादकाला हलगीचे चामडे गरम करावे लागते, असे केल्याने हलगी चांगली वाजते. मग एकूण खेळणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली जाते आणि त्यानुसार साथीदार जोडी पण ठरवली जाते. या सगळ्या नियोजनामुळे खेळा दिवशी डावात कसलाही व्यत्यय येत नाही.

मी एकदम लहान असल्यापासून हा खेळ अगदी जवळून पाहत आलोय आणि शिकत आलोय, अजूनही शिकतोयच तस बघायला गेलं तर. खूप काही शिकण्यासारखं आहे या खेळाकडून, मला तर लोककलेचा हा प्रकार खेळाहून जास्त गावातल्या लहान थोरांना एकत्र बांधून ठेवणारा रेशीमधागा वाटतो. विषय शब्दात मांडतोय म्हणून उगीच अतिशोक्ती करतोय असा मुळीच विचार करू नका. अगदी मनापासून व्यक्त होतो आणि एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, जवळच्याच एका लग्न कार्यात टिपरीचा डाव चालू करण्यासाठी एक साथीदार कमी पडत होता आणि साथीदाराशिवाय हा खेळ खेळण अशक्य, आता वऱ्हाडी मंडळींसमोर पचका होणार अशी दाट शक्यता वाटत होती, पण नेमकं तेव्हाच रिंगणाबाहेरच्या एका इसमाने गोणीतल्या टिपऱ्या उचलल्या आणि ज्याची जोडी नव्हती त्याच्या समोर जाऊन ऊभा राहिला. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? आहो जो इसम टिपऱ्या घेऊन ऊभा राहिला त्याला टिपऱ्या खेळायला येतात हे सगळ्यांना आधीच माहित होतं, पण ज्याच्याकडे जोडी नाही तो त्याचा जुना वैरी होता, जमिनीवरून दोघात काहीतरी वाद चालू होते…म्हणून कोणी पुढाकार घेऊन त्यांना बोलावलं नव्हतं. पण बघा वयक्तिक वैरी मुळे जर डाव अधुरा राहिला तर पाहुण्यांसमोर गावच्या प्रतिष्ठेला गालबोट लागेल हे लक्षात घेऊन, खेळ होईपर्यंत तो गृहस्थ संपूर्ण डाव आनंदाने त्याच्या जोडीदाराबरोब स्वइच्छेने खेळला. पटला का माझा रेशीमधागा तुम्हांला.! तस टिपरीसारखे लोककलेतील बरेचशे प्रकार या पद्धतीने रचले गेलेत, कि जे खेळताना किंवा करताना खूप सारी ऊर्जानिर्मिती होते, मन प्रसन्न होते आणि निखळ आनंद अनुभवता येतो.

खेळाबद्दल माहिती, खेळाचे फायदे, हे सगळं ठीकआहे, पण आता थोडं चिंतेच्या विषयाकडे वळसा घालू , तुम्हांला काय वाटतं झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाचा परिमाण फक्त्त प्राणी…पक्ष्यांवर आणि जमिनी विकलेल्या शेतकऱ्यांवरच झालाय ? आहो या शहरीकरणाच्या नादात माणसांनी हिरवी जंगल तोडून सिमेंट काँक्रीटची जंगल बांधली, माणुसकीची जागा पैशाने घेतली, विविध पारंपरिक लोककलेची जागा पाशात्य संस्कृतीच्या धागडधिंगाण्याने म्हणजेच डी.जे. सारख्या प्रकाराने घेतली. पण इतकं लक्षात घेतलं पाहिजे, पारंपरिक कलेची / खेळांची सर इतर कोणत्याच प्रकारातून भेटणं हे शक्यच नाही. नोकरीसाठी मुंबईकडे धावा करणाऱ्या लोंढ्यांमुळे आज गांव ओस पडत चालली, आणि टिपरीसारखे बरेचशे प्रकार हरवत चाललेत, पण मला अभिमान वाटतो छाती ठोकून सांगायला कि आजही माझ गावं हा प्रकार पारंपरिक पद्धतीने सादर करत आहे आणि पुढच्या पिढीला पण हा प्रकार खेळता यावा यासाठी तो जतन करत आहे आणि त्याच बीज इथल्या तरुण पिढीत रीतसर पेरत आहे…

शेवटी इतकच सांगेन
Lets not forget our Original Indian Culture and bring them back into existence. These type of activities were ment to bring peoples together, which is much needed in todays world and busy lifestyle.

Lets come together and spread the Feeling of Happiness

5 thoughts on “आमची लोककला ” टिपरी “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top