My Stories

हेची दान देगा देवा

हाथों की शोभा दान देने से होती है न कि कंकण पहनने से…शरीर स्नान करने से शुद्ध होता है न कि चन्दन का लेप करने से…लोग यथोचित आदर और सम्मान किये जाने से संतुष्ट होते हैं न कि केवल भोजन कराने से…तथा मृत्यु और पुनर्जन्म के चक्र से मुक्ति तत्वज्ञान प्राप्त करने से होती है न कि सिर्फ सिर के केशों का मुण्डन करने से.
हा फोटोतील वाक्यांचा शब्दश: अर्थ..चाणक्य नीति मध्ये बरेचशे व्यापक विषय अगदी मोजक्या शब्दात समजावलेत. असाच एक आजचा विषय.

शनिवार रविवार अशी वीकेंड सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या बहिणीकडे आळंदीला गेलो होतो. एकांतात नदीकाठी किंवा समुद्रकाठी पाण्यात पाय सोडून पाण्याचा खळ खळ आवाज ऐकत बसने ही माझी सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट…असाच सायंकाळी इंद्रायणी काठी एकांत अनुभवत बसलो होतो. समोरच शाळेच्या गणवेशात दोन तीन मुलं घोळका करून पाण्यात काहीतरी करत होते, तसं त्यांच्याकडे माझं अजिबातच लक्ष नव्हतं, पण पुढच्या काही मिनटात त्या घोळक्यात एक ताई शिरल्या आणि त्यातल्या एका मुलाला पकडून जोरात बदडू लागल्या, तितक्यात सोबतच्या इतर पोरांनी तिथून जोरात धूम ठोकली. अचानक झालेल्या या आवाजाकडे माझं लक्ष वळलं. मारता…मारता त्या म्हणतं होत्या “तर इथून येत्यात हे पैक.” नक्की हा काय प्रकार आहे आणि माऊली त्या मुलाला का मारत आहेत हे पाहण्यासाठी मी पुढे गेलो. मी जवळ येत असल्याचं पाहून त्या म्हणाल्या, “दादा हे माझंच लेकरू हाय.” आपल्याच मुलाला असं कोणी विनाकारण का बरं मारेल.! मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या हातात एक दोर होता, त्याच्या टोकाला मोठं लवचुंबक होतं आणि त्या लवचुंबकाला चिटकलेली नाणी त्याची आई खेचून काढत होती आणि रागाने परत पाण्यात भिरकावत होती. ते पाहून चाललेला प्रकार काहीसा मला कळाला होता. मी काही विचारेन इतक्यात त्या माऊलीनं पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाच्या पाठीवरचा शर्ट वर करून आपणच मारलेल्या फटक्यांचे वळ उठलेत का ते तपासू लागली…मग मला म्हणाली, दादा..ज्ञानेश्वर माऊलींच दर्शन घ्यायाला सगळीकडनं लोकं इथं देवाच्या आळंदीत यत्यात, पाया पडून झाल्यावं नदीत आंगोळं पांघोळ करत्यात, त्यांच्या इच्छा पुऱ्या व्हाव्या असं मागण मागून यड्यागत नदीत पैक टाकत्यात, आणि ही गाबटी शाळा बुडवून त्यच पैसं आसं हुडकून काढत्यात आणि फुकटच्या पैशावर नको त्यो धंदा करू बघत्यात…आता तुम्हीच सांगा ह्य समदं बरं हाय का ?
त्या माऊलीच्या छोट्याशा प्रश्नावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. काही वेळात त्या तिथून निघून गेल्या…पण मी मात्र निशब्द तसाच त्या पुढचा बराच वेळ माय इंद्रायणीकडे डोळे लावून बसलो होतो. आणि डोक्यात फक्त्त त्या माऊलीचा निरागस प्रश्न घुमत होता, पण उत्तर काही केल्या सापडत नव्हते.

मंदिराच्या दिवाळावर नाणी चिटकवण…धार्मिक स्थळी डबक्यात, नदीत कॉईन टाकून आपली इच्छा मागणं…किंवा मग याच्याही पुढे जाऊन चालत्या गाडीतून घाटाच्या वळणावर एखादं मंदिर दिसलं की मंदिराच्या दिशेने पैसे भिरकावणं यासारखे प्रकार आपण सर्वांनी पहिलेच असतील किंबहुना दुसरे करतायत तर आपण पण करून पाहूया, असं म्हणून स्वतः अनुभवले देखील असतील. पण मग पुढे जाऊन या नाण्यांचं नक्की काय होतं? आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवापर्यंत पोहोचण्याचा हा निवडलेला पर्याय योग्य आहे का? याचा कधी विचार केलाय का आपण.???

तसं तर हे जे काही वर्षा नु वर्षांपासूम घडत आलंय ते चूक की बरोबर ! हे मला माहित नाही. पण शास्त्रात मात्र उल्लेख आहे, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला निःस्वार्थ होऊन कोणतीही मदत करते तेव्हा त्या मदतीला ‘दान’ म्हणतात. निःस्वार्थ म्हणजे केलेल्या मदतीच्या बदल्यात काहीच आशा न बाळगणे. मग आता मला तुम्हीच सांगा, प्रत्येक कॉईन्सच्या मागे आपली इच्छा देवाने पूर्ण करावी अशी आशा बाळगणाऱ्या मनोवृत्तीला आपण दान कसं बरं म्हणायचं.

हस्तो पवित्र यदी दान पुण्य |

दान केल्यास करणाऱ्याचे हात आणि कमावलेले धन हे दोन्ही पवित्र होतात. आपण कमावलेलं धन हे जर पवित्र करायचे असेल तर त्या धनात भगवंताचा वाटा असला पाहिजे. म्हणजे त्या धनात दानाचा वाटा असला पाहिजे, मग ते धन स्वरूप असो वा इतर कोणतीही वस्तू म्हणजे ज्ञान,अन्न किंवा इतर काहीही. शास्त्रात वस्त्रदान,अन्नदान आणि ज्ञानदान यांना विशेष महत्व आहे. पैसा खर्च केला की वैभव संपते पण दान केला की वैभव वाढत जाते, म्हणून दान हे नेहमीच श्रेष्ठ. इतकं वाचून काही जणांनी डोकी चालवायला सुरुवात केली असेल, व्वा…दान केल्याने धन पवित्र होते, मग चुकीच्या मार्गाने मिळवलेले काळे धन दान करून पवित्र होते का.? असा प्रश्नच मुळात विचारू नये…कारण चुकीला माफी नाही.

आता तुम्ही म्हणाल मग दान कोणी करावे?…कोणाला करावे?…जेव्हा जेव्हा मनुष्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त काही मिळते (Surplus) मग ते काही असो, ते दान करता आलं पाहिजे. समाजात तीन लोक आहेत, एक ज्यांकडे सर्व काही आहे ज्यांना आपण धनवान किंवा विद्वान म्हणतो – यांना दानाची गरज नाही, उलट मुख्यतः यांच्यात दान देण्याची इच्छा असली पाहिजे कारण इतर दोन वर्ग यांच्या आधारावर असतात. दुसरे काही गोष्टी नसणारे – यांना दानाची नाही तर तात्पुरत्या मदतीची गरज असते तेव्हा यांना कधी गरज लागेल तेव्हाच मदत दिली तरी पूरेस असते. आणि शेवटी काहीच नसणारे (अतिशय गरीब किंवा बिकट परिस्थितीत असणारे.) – पहिल्या गटाने आपल्याकडचे जास्तीचे यांना दिले तर बरोबर तराजू समतोल राहील. म्हणून पहिल्या गटातील लोकांनी दानासाठी स्वतः हून पुढे यायला पाहिजे..

जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।
तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।

नाथ बाबांनी काशी वरून आणलेले पाणी गाढवाला पाजले होते…स्वतः ची कवचकुंडल कर्णाने याचकाला अर्पण केली होती…हे सगळं शिकवणारी आपली संस्कृती. अरे आश्रम, मंदिरांमध्ये दान उचित स्वरूपात हे दिलेच पाहिजे पण त्यासोबत ज्या…ज्या जीवांना त्याची अधिक गरज आहे तिथे दान प्रथम पोहचले पाहिजे. माणसानं दान या भावनेतून न देता..”ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन।।” (प्रत्येक जीवात माझा -भगवंताव्ह अंश आहे.) या भावनेतून दिले तर दानासोबत जिव्हाळा निर्माण होईल, मग देणाऱ्याला अहं राहणार नाही तसेच स्वीकारताना सुद्धा लज्जा वाटणार नाही.

मला स्वतःला जर विचारलेत तर, दान ही वृत्ती मी मनात आणत नाही. कारण दान म्हंटले की करणारा तो मोठा होतो आणि घेणारा तो लहान…मी माझ्या कमाई मधला काही वाटा जिथे गरज वाटेल तिथे त्या क्षणी साहाय्य स्वरूपात अर्पण करतो…मग याला दान म्हणा किंवा इतर काहीही. पण या कार्यातून मला खूप समाधान मिळते आणि एखाद्याची गरजही पूर्ण होते…शेवटी एकच सांगेन…

*”It’s not important how much you have, but it’s important how much you can give.” and that’s the real happy wali feeling.*

20 thoughts on “हेची दान देगा देवा

 1. खूप छान दादा…

  आज कित्येक मंदिरातील दान पेटीत दान केलेले पैश्यानं वाळवी लागत चालले
  तेच पैसे गरज असण्यार्यांना दिलेले काय वाईट दान म्हणून नाही निदान माणुसकी म्हणून समोरच्या माणसाची मदत व्हावी म्हणून ….ती खरी happywali feeling asel

 2. खूप छान,प्रत्येकाने थोडं का होईना आपण जे कमावतो त्यातील थोडं का होईना गरज असेल तेथे सहाय्य करावे.

 3. दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात
  प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

 4. खूप छान दादा,प्रत्येकाने आपल्या कमाईतील कमीत कमी थोडा का होईना हिस्सा गरज आहे तिथे मदत करावी ,ज्याने समोरच्या च्या चेहऱ्या जो आनंद येईल त्यात वेगळंच समाधान आहे.

 5. गरजवंताला दान नेहमी करावे हे शिकाय मिळालं, खुप छान

 6. Barobar aahi dada. Jeysta nahi pan aapleytla ful nahi tr fulachi pakli evdi jari madat Keli na tari teymadhun milnara Anand ha etar kuleych goshtit nahi

 7. विजय भावा,
  हा विषय फार छान निवडलास.
  दानासाठी सत्पात्र शोधणे तसे अवघडचं आहे. कारणाची सुरुवात अपल्यापासूनच होते. दान आपण आपल्या निकषांवर करत असतो. माझ्या खिशाला चटका तर बसणार नाहीना. एवढं भीक घालून मला काय मिळणार, वगैरे वगैरे!
  असं म्हणतात की कमाईच्या १०% दान करायला पाहिजे. जो उपाशी आहे- ज्याला गरज आहे- जो कष्ट करण्यात तयार आहे पण भांडवल नाही अशांना मदत म्हणून दान करा. रस्त्यावरचे भिकारी आणि भिंतींना पैसे चिटकवणे हे काही सत्पात्र नव्हे.
  Thanks विजय आज तुझ्या योगाने हे प्रगट करता आलं. खूप आहे यावर बोलण्यासारखं. तू या लेखातून फार उत्तरं प्रकारे सादर केलायस. तुझ्या या शैलीमुळे हा विषय खूप छान स्पष्ट होत आहे.
  सादर आभार
  YAGA

 8. पाण्यात नानी फेकण्याचे खूप दिवसा पासून चालत आले आहे. आणि ते त्या काळात योग्य आणि शास्त्रीय दृष्ट्या योग्यच होत.पण ते कुठपर्यंत जोवर ती नाणी ही तांब्याची होती तोवर . आजही आपल्याकडे अमावस्येला , दिव्याच्या पौर्णिमेला पाण्यात दिवेसोडले जातात पण तेही ही चुकीच्या पद्धतीने. पूर्वी तेही दिवे हलके आणि तांब्यचे होते.
  पण आता ते मातीचे किंवा प्लास्टिकचे आहे.
  तांबे पाणी शुद्धीकरणाच काम करत म्हणुन हे नाणी फेकणे किंवा दिवे सोडणे योग्य होते पण बाकीचे नाणे फेक चुकीची आहे.
  त्याने पाणी अशुद्ध आणि घाण होत.
  आपल्या लोकांनीना प्रथा न समजता जपल्या आहेत, त्यामागची कारणे कधी समजुन किंवा जाणून न घेता आंधळ्यासारखी जपली आहेत.
  त्यामुळे कित्येकदा तिथे आंधश्रद्धेने कीव्णा बुवाबाजी ने जन्म घेतला आहे.
  त्यामागच कारण समजुन घेतले तर कुठलीच गोष्ट चुकीची नाहीए.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top