My Stories

स्वामींचा महाप्रसाद

तसं तर माझी आणि स्वामींची ओळख ही मी बारावीत असल्यापासूनची. हो बरोबर वाचलंत, मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्री स्वामी समर्थांबद्दल बोलतोय.प्रत्यक्ष प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोयीचं जाईल.मी इयत्ता बारावीला होतो आणि बारावी म्हटलं की बोर्डाची परीक्षा.एक भलतीच भिती मनात असते, त्यात ऐन इकॉनॉमिक्स च्या पेपर आधी माझी तब्बेत काहीशी खराब झाली होती,तसा अभ्यासात मी आधीपासूनच हुशार पण आजारामुळे काहीसं दडपण होतं मनावर. बारावीला असलो तरी पेपरादिवशी वडील सेंटरपर्यंत सोबत यायचे सोडायला.बरोबर अर्धा तास आधी कॉलेज मध्ये पोहोचलो.आत जाण्यापूर्वी बाबांनी माझ्या गालाचा मुका घेतला आणि म्हणले सोप्पा जाणार बघ पेपर, मग हसतच म्हणाले औषधं खाल्लंयस फक्त झोपू नकोस रे राजा, हो तुम्हाला वाचून हसू येईल पण ऐन पेपरमध्ये झोपायचा पराक्रमही मी या आधी करून झालोय.वर्गात जाऊन पुस्तकं सोबत घेतलं आणि बॅग वर्गाबाहेर ठेवली आणि सगळ्या पॉईंट्सवर लक्ष फिरवत होतो,थोड्या वेळात मॅडम वर्गात आल्या त्यांनी सांगितलं पुस्तकं बाहेर बॅगेत ठेवा, ज्या प्रश्नाचं उत्तर वाचत होतो ते वाचून मी पुस्तकं बॅगेत ठेवण्यासाठी वर्गाबाहेर गेलो.आणि तिथेच मला स्वामींनी दर्शन दिलं. हो…पुस्तकं ठेवण्यासाठी मी बॅगेचा पहिला कप्पा खोलला तर त्यात दोन फुलं आणि तळहाताएवढा स्वामींचा लॅमिनेट केलेला फोटो कोणी तरी ती बॅग स्वतःची समजून ठेवला होता. तो फोटो हातात घेतला स्वामींच्या प्रतिमेला पाहताच मग एक वेगळ चैतन्य संचारलं मनात. त्या फोटोला नतमस्तक होऊन मी तो पेपर लिहला, तो ही एकही डूलकी न मारता. इतक्या जणात आता तो फोटो नक्की कुणाचा ते शोधता आलं नाही, मग मी असंच मला मिळालेला आशीर्वाद समजून तो फोटो घरी घेऊन आलो.त्याच्या मागे लिहलं आहे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी तो फोटो माझ्या पाकिटात जपून ठेवलाय.आणि त्या ओळींप्रमाणे स्वामी देखील प्रत्येक कार्यात माझ्या पाठीशी सकारात्मक शक्ती रूपे नेहमीच असतात.तर अशी ही स्वामींची आणि माझी ओळख.

आता बरोबर दहा वर्षानंतर कुटुंबासोबत श्री क्षेत्र अक्कलकोट, गाणगापूर दर्शनाचं भाग्य लाभलं.भल्या पहाटे पंढरपुरात सावळ्या विठ्ठलाचं आणि आई रुक्मिणीचं दर्शन घेऊन माय चांदभागेला प्रणाम केला आणि आम्ही थेट अक्कलकोट गाठलं, मध्ये वाटेवर येणारे दोन पॉईंट कव्हर केले त्यामुळे अक्कलकोट पोहोचण्यासाठी आम्हांला चार वाजले. आजच्या ठरलेल्या प्लॅन नुसार आम्ही गाणगापूर मध्ये राहणार होतो पण प्रवास खूप झाल्याने आम्ही आजचा मुक्काम अक्कलकोट मठात करायचं ठरवलं. मठात अगदी कमी खर्चात राहण्याची खूप उत्तम सोय आहे.आम्ही सगळ्यांसाठी स्वतंत्रपलंग सेवेनुसार राहण्याची जागा पक्की केली,मग थोडं फ्रेश होऊन दर्शनासाठी तयार झालो.
श्री क्षेत्र अक्कलकोटचा संपूर्ण परिसर…म्हणजेच मठ, मंदिर क्षेत्र, समाधी मंदिर इथल्या प्रत्येक वास्तूत एक वेगळंच चैतन्य आहे, खूप सकारात्मक शक्ती आहे. आणि त्यात आवाराच्या आजूबाजूला असणाऱ्या दुकानात सातत्याने वाजणार “श्री स्वामी समर्थ” नामाचा जपमंत्र वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो. गावातल्या समाधी मंदिराच्या दर्शनापूर्वी आम्ही महाप्रसाद घेण्याचा निर्णय घेतला.

महाप्रसादाची वेळ आठ ते दहा. मग पंधरा मिनटं आधीच आम्ही रांगेत ऊभे राहिलो.दुपारचे जेवण थोडे लवकरच झाल्याने सगळ्यांना चांगलीच भूक लागली होती.पुढच्या पाचचं मिनटात रांग सरकू लागली आणि मी मठाच्या प्रशस्त महाप्रसाद सभागृहात प्रवेश केला.बापरे एकाच वेळी पाचशे माणसे जेवतील इतका मोठ्ठा तो हॉल आणि त्यात सजावटीचे हिऱ्यांसारख्या खड्यांचे मोठाले झुंबर अगदी चकाकून दिसत होते.समोरच असलेल्या स्वामींच्या पालखीचं, गुरुदेव श्री दत्तांच्या आणि स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. मग भाऊजी आणि दोन भाच्यांसोबत बसलो पंगतीत टेबलावर, या नंतर मी जी #happywalifeeling अनुभवली, ती मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. आणि खरं सांगायचं झालं तर हाच अनुभव सांगण्यासाठी मुळात मी हा लेख लिहिला आहे.

अगदी लहानपणापासून पंगतीत जेवायची मोठी हौस मला.मग लग्न,भंडारा, बारस अश्या कोणत्याच पंगती मी आतापर्यंत सोडल्या नसतील.आणि मंदिरात गेल्यावर आवर्जून मी महाप्रसाद घेतोच.चार वर्षांपूर्वी मी गोल्डन टेम्पलच्या लंगरमध्ये देखील जेवलो होतो पण तिथे बऱ्यापैकी ऑटोमशिनचा वापर केला गेला आहे, म्हणजे जेवण वाडण्यासाठी मशिन्सचा उपयोग होतो.पण इथे मठात मात्र सगळं कार्य स्वतः स्वयंसेवक करतात म्हणून थोडा वेळ लागेल असा अंदाज होता. मग या वेळात माझं सेल्फी शूट चालू झालं. दोनचं मिनटात स्पिकरवर सर्वसामान्य सूचना चालू झाल्या, लहान मुलांच्या पालकांनी मुलांसाठी लागेल तितकेच अन्न घ्यावे, अन्न वाया घालवू नये, ताटात प्रसाद शिल्लक ठेऊ नयेत वगैरे वगैरे..आवाजावरून लक्षात आलं की या सूचना रेकॉर्डेड नसून कोणी व्यक्ती माईक वरून देत असावे.थोडे इकडे तिकडे शोधले तर पुतळ्याच्या बाजूला एका कोपऱ्यातून एक गृहस्थ या सूचना देत होते.या सूचनांनंतर लगेचच ते म्हणाले चला सर्वांनी आता देवाचे नामस्मरण करूयात,आणि त्यांनी श्री स्वामी समर्थ..जय जय स्वामी समर्थ..नामस्मरण चालू केले मग त्यांनी त्यांच्या मागोमाग सर्वांना बोलायला सांगितले,आणि पुढच्याच क्षणात हॉल मधल्या लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाने टाळ्यांच्या ठेक्यावर ताल धरला..हो हो म्हणता एक वेगळाच माहोल तयार झाला. मी ही नकळत त्या तालात विलीन होऊन हा आनंद सोहळा डोळ्यात साठवत होतो..दोन मिनिटांने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे बोल रंगले..संपूर्ण वातावरण अगदी भक्तीमय होऊन गेले आणि या सगळ्यात तिथल्या स्वयंसेवकांनी जेवणाचे पदार्थ ताटात कधी वाढले ते कळलंच नाही,पण मी विचार केलेला त्याहून कमी वेळात पंगतीत संपूर्ण जेवण वाढायचं काम फत्ते झालं होतं.आता स्वामींचाच महाप्रसाद तो, मग त्याची चव काही न्यारीच. हा महाप्रसाद घेताना मला अगदी लहानपणी आई रोज जेवणाआधी वादनिकवळ बोलून घ्यायची ते दिवस आठवले.बघा ना एकीकडे पाश्चात्य संस्कृतीचं वार लोकांच्या डोक्यात घर करू लागलंय तर दुसरीकडे मठात महाप्रसाद स्वरूपात संस्कारांची जपणूक शिकवली जाते आहे. मला ते भक्तिमय वातावरण व्हिडिओ स्वरूपात कैद कारायचे होते पण तिथे व्हिडिओ घेण्यास मनाई आहे. मग मी मंदिर समिती सोबत बोलण करून हा खास व्हिडिओ शूट करण्याची परवानगी मिळवली. मठात सरासरी दिवसातून दहा ते वीस हजार भाविक याचं पद्धतीने महाप्रसाद ग्रहण करतात.या वेळात मी तिथल्या पदाधिकाऱ्यांसोबत काही बोलणं देखील केलं तेव्हा मला कळलं की प्रत्येक दत्तजयंती ला मठात सुमारे दीड ते दोन लाख भाविक महाप्रसाद घेतात आणि त्यांच्या सांगण्यानुसार स्वामी कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाहीत.मग पुढच्या दोन पंगतीत मी स्वतः स्वयंसेवक म्हणून सेवा केली आणि पाऊणे दहा च्या सुमारास आम्ही समाधी मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. वाटेत एक दोघे जण म्हणाले तुम्ही जाई पर्यंत मंदिर बंद होईल, दर्शन पहाटे घ्या.पण पहाटे आम्हांला लवकर निघायचे होते म्हणून आम्ही वेग वाढवला आणि नाशिबाने साथ दिली.ऐक पुजारी मंदिराचे दरवाजे बंद करायचायच्या तयारीत असताना आम्ही तिथे पोहोचलो.मग मंदिरात फक्त आम्हीं आणि स्वामी, मनसोक्त ते गोजिरं रूप डोळ्यात साठवलं आणि पुन्हा मठात जाऊन आराम केला.

दुसऱ्या दिवशी गाणगापूरला श्रीपाद वल्लभ दिगंबराचं दर्शन झालं…सोबत अखण्ड परायणात गुरुचरित्राचे वाचन करता आलं.आणि तिथून पुढे आम्हीं नियोजित तुळजापूर,आळंदि अशी कौटुंबिक देवदर्शन यात्रा पूर्ण केली.

पण अजुनपण महाप्रसादाचा तो प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा ऊभा राहतो..तेव्हा पासून या सगळ्या गोष्टीत मी स्वतःच माझ्या मनाला पडलेल्या दोन प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न केला ते म्हणजे जेवणापूर्वी नामस्मरण का? आणि अन्न का वाया घालवू नये?
आणि यांचं मला सापडलेलं उत्तर म्हणजे..

भोजन नामस्मरण का?

भोजन हे फक्त सामान्यतः जेवण नसून तो मानवी शरीरामध्ये प्रजवलीत झालेल्या जठराग्नी ला प्रसन्न करण्याचा यज्ञ आहे..
या भावनेने जर अन्न आपण पाहिले तर ते परब्रम्ह स्वरूप आहे..यासाठी यज्ञ च्या आधी कृष्णार्पणमस्तु, ब्रह्मरपनमस्तु किंवा वदनी कवळ घेता…हे त्या यज्ञातील आहुती साठी म्हटले जाणारे श्लोक आहे…भगवंताचे नामचिंतन केले की चित्त शुद्ध होते…मग जेवण घाईघाईने न होता शांततेत होते..आणि विज्ञान शुद्ध सांगते शांततेत जेवले तर सर्व अन्न चांगल्या रीतीने पचन होते.तसे तर प्रत्येक कामा आधी प्रभूंचे नाव घ्यावे..

सकळ मंगळ विधी । श्री विठलाचे नाम आधी ।।

या वृत्तीप्रमाणे भोजन सुद्धा करताना ते घेतले पाहिजे

अन्न वाया का घालवू नये?

जसे आपण देवाच्या देवळातले शीत सुद्धा प्रसाद म्हणून खातो…ते जरी साधा शिरा किंवा खोबऱ्याचा तुकडा असेल तरी प्रसाद ही उपमा असल्याने एका घासानेच चैतन्य मिळते…सात्विकता प्राप्त होते..तसेच जर आपण श्लोक म्हणून,प्रार्थना करून आपले जेवण नुसते जेवण न राहता त्याला भगवंताचे नाम लागल्याने त्याचा प्रसाद होतो आणि प्रसाद वाया घालवू नये..म्हणून अन्न वाया घालवू नये..

आणि आपण एखादी चपाती किंवा भाजी सहज फेकतो तेव्हा नुसते ते अन्न फेकले जात नाही…तर फेकले जातात त्या शेतकऱ्यांचे प्रयत्न जे सकाळी सकाळी चार वाजता सुद्धा काडाक्याच्या गारठ्या मध्ये पण मोटेने पाणी सोडतात..ते प्रयत्न शेतात शेतकऱ्याने आपल्या मुलांप्रमाणे जपलेले ते पीक फेकून आपण एक प्रकारे बालहत्या करतो.आपण फेकतो ती भूक…जी एखाद्या रस्त्यावर कुणी टाकलेला तरी घास मिळतोय का याची वाट पाहत असते..

ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना जाऊन विचारा…सहज कळेल…अन्न का फेकू नये..

कदाचित या प्रश्नांची उत्तर काहीशी वेगळी देखील असू शकतील.(चुकभुल द्यावी घ्यावी.) पण स्वामींच्या महाप्रसादातून मला तरी हीच शिकवण अनुभवता आली राव.

13 thoughts on “स्वामींचा महाप्रसाद

 1. जय श्री स्वामी समर्थ .गुरुदेवदत्त गुरुदेव दत्त.

 2. Shree Swami Samarth..Vachun khup chan vatale.khup Divsan pasun me olkhto tumhala..Olkah tashi gupit ahe..Swami bhakta kadhi na kadhi bhetat..Me rahato Koparkhairane madhe..kadhi swami chi iccha asel tar nakki bhetu..Shree Swami Samarth.

 3. Khup sundar vijay ghari baslya swaminche
  darshan zale tuzya lekhatun… श्री स्वामी समर्थ

 4. SHREE SWAMI SAMARTHA…khup chan vatla vachun…Hum gaya nai zinda hai hey swami bhaktani nakkich anubhavla asen…mi pn ek swami bhakta ahe swami aaplya bhaktanchi sath kadhich sodat nahi hey mi majhya anubhavavarun sangen..

 5. खुप छान वाटल वाचुन माझा एक मित्र आहे मुकुंद नावाचा त्याच्या मुळे मी कधीच अन्न फेकन्याच काम करत नाही कारण एकदा असच आम्ही जेवायला बसलो होतो तेव्हा त्याने अन्न उरलेल बघितल आणि मला म्हणाला हे तुम्ही जे फेकताय ते तुम्हाला जास्त झाल म्हणून पण ते तुमच्या पर्यंतर यायला कोणी कोणी किती मेहनत घेतली ह्याचा जरा विचार करा आणि त्याने एक प्रोसेस पण सांगितली तेव्हा पासुन जेवढ लागेल तेवढच घ्यायच आणि खायच हे मी आचरणात आणतो भावा.

 6. मस्त भाऊ आज काहीतरी नवीन सांगितलं आणि दाखवलंय आणि तुझा पोस्टन “श्री स्वामी समर्थ” दर्शन झालंय

 7. श्री स्वामी समर्थ ….
  खुप छान लेख वाचून मन प्रसन्न झाले.. स्वामी आपल्या भक्ताच्यां सदैव पाठिशी असतात….

 8. Very nice Vijay. I never visited this place but I heard lot. After reading your blog I am thinking to plan next visit to Akkalkot. thank you.

 9. विजय भावा,
  अक्कलकोटला मीसुद्धा गेलो आहे, स्वामीदर्शन आणि महाप्रसाद आणि प्रसाद वाटपाची स्वयंसेवा ही केली होती.
  पण तुझा दृष्टिकोन आणि ढंगच निराळा रे भावा. तुझा हा द्रष्टा भाव आणि आनंद देण्या घेण्याची लकब म्हणजे खरंतर स्वामींचा महाप्रसादच आहे. हा कधीच वाया जाऊ देऊ नको. तू वाया जाऊ देणार नाही याची खात्री आहेच.
  तुझ्या आगामी post आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  YAGA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top