My Stories

आईचे पत्र

प्रिय बछडयांनो

खूप जास्त आठवण येते तुमची आणि तितकीच काळजी पण वाटते रे माझ्या पिल्लांनो. तुम्ही सुखरूप आहात ना ! मी आता तुमच्या सोबत नाही मग तुम्ही काय खात असाल ? बऱ्याच महत्वाच्या शिकवणीचे धडे देण्याच्या ऐन वयात अर्ध्यावर तुमचा हात सोडून मला जाव लागलं, माफ कराल ना तुम्ही मला ! तसं तर वाघिणीचे बछडे म्हणल्यावर येईल त्या परिस्थितीवर मात कराल रे, पण काय करू शेवटी आईचं काळीज ना! त्यात तुमचं वय तरी असं किती रे माझ्या बाळांनो.

इतक्या लांब इथे मनुष्यप्राण्याच्या कृपेने मी पोहोचली आहे खरी पण मला कळेना नक्की हा स्वर्ग आहे की नरक, इतक्या माणसांना खाणारी T1 वाघिण असा आरोप म्हणल्यावर बहुतेक हा नरकच असावा. ते काहीही असो पण तुम्हांला एक गंम्मत सांगते जिवंतपणी ज्या गोष्टीची अपेक्षा होती त्या सगळ्या गोष्टी इथे हुबेहूब आहेत. म्हणजे घनदाट जंगल, हिरवीगार झाडं, सुंदर पाण्याचे झरे, शुद्ध हवा आणि मोठाले तलाव. हे सगळं पाहून थोड्या वेळासाठी मनात स्वार्थी विचार आला की थोडं लवकरच यायला हवं होत इथे, पण मग तुम्हां दोन गोंडस बाळांना जन्म कसा देता आला असता, मातृत्व कसं अनुभवता आलं असतं.!

तसं मुद्दामच मी थोडं उशिरा पत्र लिहिते आहे, आतापर्यंत इथून पृथ्वीतलावर मी गेल्यानांतरच्या सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होते. वृत्तमानपत्र आणि बऱ्याच न्यूज चॅनेल ने तर माझा रीतसर बायोडाटाच बनवलेला मग त्यात मला पकडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची शिकस्त म्हणजेच मागवण्यात आलेले स्पेशल हत्तींचा कळप, नंतर इटालियन कुत्रे, कॅमेरा आणि ड्रोन चा जंगलातील सापळा त्यात पायी वनकर्मचाऱ्यांचा गस्त, विशेष लिक्विडचा शिडकावा, शेवटी बोलवण्यात आलेले शार्प शूटर अजगर. आणि या सगळ्यांवर मात करून आपल्या बछड्यांना सुरक्षित जागी लपवन्यात यशस्वी ठरलेली अवनी असं म्हणतं मला जणू त्यांनी हिरोईनच बनवून टाकलेलं. मी तुम्हांला हे सगळं मुद्दाम सांगते आहे बरे का, आता तुम्ही म्हणाल वा आई किती चांगली असतात ही माणसं, पण असं म्हणत अजिबात हुरळून जाऊ नका, प्रत्येक बातमीची सुरवात काहीही असो शेवट मात्र एकच होता ” अशी ही T1 नरभक्षक वाघीण आणि तिची जनसामान्यातली दहशत ” आपला स्वार्थ कसा साधायचा हे या मनुष्यरूपी प्राण्यांकडून जरूर शिकावं. जाऊदेत या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत बऱ्याच प्राणीमित्र संघटनांनी मी जाण्याची हळहळ व्यक्तही केली, बातम्यांत तसं नमूदही केलं, पुढे जाऊन माझ्या मरणावरही या माणसांनी आपल्या राजकारणाची पोळी शेकून घेतली. पण आज दीपिका आणि रणबीर च्या लग्नाची बातमी दाखवताना या अवनीचा आणि तिच्या दहा महिन्यांच्या बछड्यांचा यांना साफ विसर पडला. याच वाहिन्यांवर काल Happy Childrens Day ची जाहिरात पण येताना मी पाहिली. अरे पण माझी दहा महिन्यांची तनुली बाळ अजून जंगलातच भुकेलेली आहेत आणि त्यांची वनविभागाला अजून काहीच माहिती मिळालेली नाही याचा विसर सगळ्यांना कसा बरं पडू शकतो..

आता मी माणसांच्या बस्त्यात का घुसले? की मग मला जिवंत पकडायचा प्रयत्न केला गेला की नाही? बेशुद्ध करण्यासाठी मारलेला डार्ट हातानेच लावलेला का? या बद्दल मला काहीच बोलायचे नाही…कारण मला माहित आहे मी आता जिथे पोहोचले तिथून मी आता परत कधीच येऊ शकतच नाही. हो पण एक मात्र नक्की सांगते, तब्बल २२०० वाघांची संख्या असलेला आपला भारत आणि त्यातले जवळपास २०० वाघ असलेला महाराष्ट्र. आता यवतमाळ मधील बोराटी गावात एका अवनीचा विषय माणसांसाठी संपलाय, पण उद्या १९९ – T1 बस्त्यांकडे डोळे लावून आहेत त्यात माझे दोन छोटे बछडे देखील असतील अर्थात तुम्ही त्या माणसांच्या हातून वाचलात तर किंवा तुम्हाला त्यांनी आता शोधून काढले तर. अरे बाळांनो आता यांना कसं समजाऊ की यांच्या प्रगतीच्या धोरणात आडवी आलेली आमची जंगल, झाडाची झालेली बेलगाम तोड आणि त्याच जागी घडवलेली सिमेंट काँक्रिटची जंगले ही या सगळ्या समस्यांची पाळंमूळं आहेत.

मन घट्ट करून इतकं सगळं लिहलंय खरं पण तुम्ही मला दिसत का नाहीत याचाच मनाला घोर लागलाय. माझ्या कानात तुमचाच आवाज घुमतोय, डोळ्यात तुमचेच इवलूशे चेहरे दिसतायत आणि असं वाटतंय तुम्ही जणू आता याल आणि मला बिलगाल. माझी बाळांना मला एकदा डोळे भरून पहायचय..

शेवटी मला हिरोईन बनवणाऱ्या न्युज चॅनेलना…शोधमोहिमेदरम्यान अडथळा आला तरच वाघिणीला ठार मारावे पण प्रयत्न तिला जिवंत पकडायचा असावा अशी ऑर्डर देणाऱ्या कोर्टाला, CCTV चे जाळे लावलेल्या वनविभाग खात्याला, आरोप प्रत्यारोपात दंग असणाऱ्या राजकारणी मंडळींना, सरकारविरोधात निदर्शन काढणाऱ्या प्राणीमित्र संघटनांना आणि शेवटी तुम्हां जनसामान्यांना एकच निवेदन आहे, माझी बछडी अजून त्याच जंगलात आहेत आणि त्यांना तुमच्या मदतीच्या हाताची गरज आहे. मी शरीराने मेलेली असली तरी मनाने मात्र त्यांच्यातच घुटमळते.
जर तुम्ही त्यांना वाचवू शकलात तर खऱ्या अर्थाने तुमचे प्राणीप्रेम सिद्ध होईल आणि SAVE TIGERS चा नारा देणाऱ्या मनुष्यप्राण्यावर आमचा असलेला विश्वास जिवंत राहील…

तुमची हरवलेली आई 🐾

22 thoughts on “आईचे पत्र

 1. Bhava manala halwa zalare patra vachun….kharach bicharya aavnicha jiv ghutmalat asel tichya pillanmadhe……bharun aala maan bhava…..radavlas

 2. Dada mast patra lihal aahes eka aai chi tichya bala badalchi bhavana khup changly ritine mandali aahes aani asa vichar tuch karu shakto proud of you vijay dada

 3. खरंच खूप छान पत्र लिखाण आहे. आपण सगळ्यांनी अवनी कडे फक्त एक वाघीण म्हणूच पाहिले पण तिच्याकडे पण एका आईचे काळीज आहे हे पहिलेच नाही.

 4. खूप छान आईचे पत्र.. मन भरुन आले

 5. Vijay mitra.. Aaj chotyashya patratun barech kahi sangun gelas.. Aata tari Development chya navkhali chalu asleli Jangal tod thambli pahije..

 6. उशीरा पत्र वाचल्या बद्दल sorry .पण खुप सुंदर .हे पत्र वनमंत्र्यापर्यंत पोचेल असे काहीतरी कर

 7. खूपच सुंदर लिहीलंय भाऊ,, एका आईची वेदना, व्यथा आणि लेकरासाठी असलेली काळजी अगदी समर्पक शब्दात व्यक्त केली आहे. आणि मनुष्य हा किती अप्पलपोटी स्वार्थी आहे, आपली पोळी कुठे आणि कशी भाजायची हे ज्याला बरोबर समजत याचंही चित्रण आलंय तुमच्या पत्रात
  असेच लिहित रहा
  लेखन यात्रेला शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top