My Stories

येळकोट येळकोट

तसा तर येत्या शनिवारी चिंतामणीच्या पाट पूजनाचा सोहळा अनुभवण्याचा बेत होता पण शुक्रवारी आई म्हणाली रविवारी अथर्वचा (माझ्या मोठ्या दीदीचा छोटू ) वाढदिवस आहे, जाऊया का तिच्याकडे, मग विचार केला पाटपूजना ऐवजी आगमन सोहळ्याला जाऊ बाप्पाच्या…आणि केली मनाची तयारी आळंदीला जायची…दोन दिवस ताईला पण सुट्टी, तीला म्हणलं तू अर्णव आणि जीजू पण चला, म्हणजे कौटुंबिक एकत्रिकारण होईल..तिने पण लगेच होकार दिला…आमची गाडी निघाली शनिवारी पहाटे ज्ञानेश्वर माऊलींच्या वाटेला…

गाडीत अचानक नियोजन झाले की आज जेजुरीला जाऊ सगळे.
व्वा…जेजुरी नाव निघाल आणि लगेच डोळ्या समोर चित्र उभं राहील गडावरच्या बाबा आणि माऊलींच ज्यांच्या दुकानावर मी मागच्या वर्षी २० मिनिट बसलो होतो अंजीर विकायला त्यांच्या मदतीला, ( त्या २० मिनटात मी त्यांना दिवसभरची कमाई करून दिली होती. ) मागच्या वर्षी मित्रांसोबत त्यांचा निरोप घेताना त्या माऊलीने सांगितलं होतं, पुढच्या वेळेला बायका पोरां बरोबर ये आणि तेव्हा आमची गाठ न चुकता घे रं लेकरा…वाटलं आत्ता त्यांची गाठ होणार परत एकदा आज मल्हार गडावर. मनातल्या मनात खूप जास्त खुश झालो…

मग काय झाली सुरुवात फॅमिली पिकनिकची, ताई जीजू आणि राहुल दादा (आमचे कौटुंबिक मित्र) यांसोबत…आळंदी पोहोचून दीदी मोठे जीजू आणि चिल्लर कंपनी पण सामील झाली आमच्या गँग मध्ये…तिथून तुळापूर..थेऊर…नारायणगाव करत आमची स्वारी दाखल झाली जेजुरीला…

अगदी खरं सांगतोय गडाची पहिली पायरी चढली तेव्हा पासून मनाला जितकी ओढ मल्हारी देवाच्या दर्शनाची लागली होती ना, तितकीच आतुरता अंजीर वाल्या बाबा आणि त्यांच्या कुटुंबाला भेटायची लागली होती…थोड्या पायऱ्या चढलो आणि तिथे हळदीने माखलेला खंड्या समोर शेपूट हलवताना दिसला…त्याच्या बरोबर थोडा खेळलो, त्याला बिस्कीट चारल आणि पुढे पायऱ्या पार करत राहिलो…चिल्लर पार्टी सोबत मध्ये खेळण्याच्या दुकानात एक हॉल्ट झाला…खेळणी घेऊन परत पुढे चालत राहिलो…पण चालत असताना माझी नजर सतत शोधात होती त्या कुटुंबाला, आणि कानाला आतुरता होती त्या बाबांच्या कणखर आवाजाची…मला दुकानाची जागा अजिबातच आठवत नव्हती, प्रत्येक क्षणाला वाटत होत अजून दोन पायऱ्या चढलो की पुढे भेटतील ते मला…असं करत करत थेट गडाच्या टोकाला पोहोचलो…थोडा निराश झालॊ होतो, मनातच म्हणालो आत्ता काही नाही होतं भेट माझी त्यांच्या बरोबर…चप्पल स्टॅन्ड मध्ये काढून मग आम्ही सगळे मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेने चालू लागलो…जास्त नाही पण थोडी गर्दी होतीच…रांगेत येळकोट येळकोट जय मल्हार आवाज सगळीकडे घुमत होता…लगे हात मी पण दिला दोन तीनदा आवाज आणि मग माझा आवाजामागे सगळ्या कुटुंबाने देवाच्या नामाचा जयजयकार केला…असे करत करत थेट गाभाऱ्यात पोहाचलो…एक टक खंडेरायाला पाहून त्याचे मनोभावे दर्शन घेतले…त्याला इतकच म्हणालो परत एकदा भेटलो की रे राजा तूला..तुझी कृपा दृष्टी अशीच राहूदे, सगळयांना सुखी ठेव…आणि रांगेतून सर्वांसोबत बाहेर पडलो..
एक वेगळीच सकारात्मक उर्जा आहे गडावर…तिथे असलो ना की खूप जास्त प्रसंन्न वाटत…शरीरातला थकवा आणि डोक्यातले टेन्शन काही वेळासाठी का होईना पण अगदीच छूमंतर होऊन जाते…बाहेर येऊन थळी..प्रदक्षीना आई निशू आणि बाळा सोबत पूर्ण केली…पिवळ्या धमक सोन्याच्या जेजुरी गाडाच रम्य ते रूप डोळ्यात भर भरुन साठवल…आणि मग सुरुवात केली गड उतरायाला…

गड चढताना मानाच्या घोड्याच दर्शन नव्हते घेतले…मग उतरताना पाहिलं काम ते केलं…त्याला पाहताना एक क्षण ही माझी पापनी मिटली नसेल… पांढरा शुभ्र रंग त्याचा हळदीने खांद्याजवळ थोडासा पिवळसर झाला होता…अगदीच बोलके डोळे…आणि त्यावर रेखीव पापन्या…झूपकेदार शेपूट…काय वेगळाच रुबाब आहे त्याचा… उगीच का खांडेरायाचे वाहन होण्याचा मान त्याला भेटला असावा…तिथून माझा पाय निघत नव्हता…वाटत होतं त्याला पाहतच राहावे…तितक्यात ताई म्हणालीच, इथेच राहायचा विचार दिसतोय तुझा…चल सगळे चाललेत…मग मनात नसताना त्याचा मला निरोप घ्यावा लागला…

मोजून दहा ते बरा पायऱ्या उतरलो, पुढे मोकळी जागा असल्याने तिथे फॅमिली क्लिक घ्यायचे ठरले…आता आमच्यात सगळयात जास्त लंबू मीच , म्हणून selfie काढायचा मान नेहमी मलाच भेटतो…कारण लांब हातामुळे सेल्फी स्टिकची गरज पडत नाही..चांगले दोन तीन फोटो काढले, फोटो कसे आलेत ते पाहण्यासाठी सगळ्यांनी मला घोळका करून घेरले…या सगळ्याच्या गडबडीत माझ्या कानावर ओलखिचा आवाज ऐकू आला..
” दादा…ओ दादा.. इकडे बघा की… ओ दादा ” दोन पायऱ्या सोडून पुढे आवाजाच्या दिशेने मी पाहिले, तोच दर्शन झालं त्या माऊलीच, जिला मी गड चढताना डोळ्यात जीव आणून शोधत होतो…हातातला मोबाईल निशा ( माझी बायको )कडे देऊन मी दोन उड्यातच त्या दुकानावर पोहोचलो…मला पाहून त्यांच्या गालांवर एक वेगळंच हसू उमटले होते…डोळ्यात तोच साधेपणा…मला आपुलकीन त्यांनी विचारलं ” कसा आहेस र लेकरा ? ” मी म्हणालो एकदम मस्त…मी लगेच उद्गारलो. तुम्ही ओळखलं मला ! त्या म्हणाल्या न ओळखायला काय परका आहेस का तू ? आता स्वतःच सार्थक झाल्यासारखं वाटलं…त्या म्हणाल्या, अर्ध्या पाऊण तासा पासून तुमचीच वाट पाहते…मला काही कळेना या आमची वाट…ते कसे बरे…मी विचारलं म्हणजे आम्ही वर गेलो तेव्हा तुम्ही मला पाहिले होते का? त्या म्हणाल्या… नाही ना…मग तवाच हाक मारली असती की…तू मगाशी वर गेलास तवा मी पैसे सुट्टे करायला बाजूच्या दुकानात गेली व्हती… पण सोमोरच्या हौशीनं तूला ओळखल ( हौशी म्हणजे पुढच्या दुकानवाल्या ताई ).. तिनं मला सांगितलं अंजीर विकलेला दादा आलायं दर्शनाला, आत्ताच वर गेलाय.. पण तोवर तू थोडा वर गेला होतास, मला दिसत होतास पण मग पुढं गेलेल्या माणसाला कशी हाक मारणार ! म्हणून तुझी वाट बघत बसले तवा पासून…तुझ्या हातात बाळ होतं जाताना, तुझ होय का ? मी म्हणलं हो… तुम्ही म्हणाला होता ना पुढच्या वेळी पोरां बाळा सोबत ये..बघा आलो की नाही…इकडे तिकडे पाहत मी विचारलं, बाबा कुठे दिसत नाही…त्या


म्हणाल्या बाबांची तब्बेत थोडी बरी नाही म्हणून आज एकटीच आले…मी विचारलं काय होतंय त्यांना ? त्यांनी सांगीतल रोजच आपलं सर्दी खोकला..बाकी बरे आहेत ते..मी म्हणालो थांबा मी सगळ्यांची ओळख करून देतो…तो पर्यंत सगळेजण दुकाना पर्यंत पोहोचले होते…तसे तर आई निशू या माउलींना ओळखुन होत्या पण ती ओळख फोटो मधली आणि माझ्या वर्णनातली…आता त्यांना प्रत्यक्षात भेटून सगळ्यांच्याच चेहऱ्यावरवर खूप आनंद हुरळू लागला होता…मी कुटुंबातल्या प्रत्येकाची ओळख त्यांच्याशी करून दिली…त्या माऊलीन माझं तोंड भरुन कौतुक माझ्या माऊली कडे म्हणजेच आईकडे केलं…राव काय बरं वाटलं सांगू तुम्हाला असं स्वतः विषयी चांगलं दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला…यावेळी त्याचं दुकानं हे पेरूचं होत…त्यांनी लगेच चार पेरू कापून चिल्लर पार्टी च्या हातावर ठेवले…मला त्या हळूच म्हणाल्या, बायको खूप गोड दिसते बरं तुझी…थांब तिची मज्जा करू…मग त्यांनी आवाज दिला…ओ सुनबाई माझं लेकरू लय भाबड हाय बरं…चांगलं सांभाळ त्याला…तेव्हा मला हसू नाही आवरता आलं…आता तिथून निघावं लागणार हे प्रत्येकाला कळत होत पण कोणाच्याच पायांना पुढे जाण वळत नव्हतं..पुढून त्या स्वतःच म्हणाल्या बर वाटलं रे तुझ्या घरच्या माणसांना भेटून… सगळे तुझाच सारखे आहेत हसून खेळून…असच रहा नेहमी सगळे…निरोप घेण्यापूर्वी मुद्दामच मी सूर धरला,
” पेरू घ्या पेरू…लय गुळमाट हायत पेरू ” आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हसू उमटलं… मग त्यांच्या पाया पडून गड उतरायला परत एकदा सुरुवात केली…यावेळी त्या नाही म्हणाल्या की पुढच्या खेपेला गाठ घेतल्या शिवाय जाऊ नको, कारण कदाचित त्यांनाही कळाले होते की मी आता जोडला गेलोय त्यांच्याशी कायमचा…अगदी नजरे आड होई पर्यंत आम्ही वळून त्यांना पाहत होतो आणि त्या सुद्धा हात उंचावून आम्हाला निरोप देत होत्या…

वाटलं खंडेरायाच पावला आणि त्यांनी आमची सांगड घातली असावी…

‘ Again Feeling happy happy wali feeling. 😇 ‘

2 thoughts on “येळकोट येळकोट

  1. विजय, १ नंबर भावा.
    खूप दुर्मिळ आहे २०-२५ मिनिटाच्या पहिल्या भेटीत लोकं इतकं लक्षात ठेवतील. यासाठी भावा तुझ्यासारखाच व्यक्तिमत्व हवं!!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top