My Stories

विठ्ठल विठ्ठल

मित्रांसोबत वारीमध्ये १०,००० लाडू वाटप आणि निर्मल वारी माहिती प्रसारासाठी लोणंद येथे गेलो.तसा तर वारी मध्ये सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ, विचार केला आधी माऊलींच्या पादुकाचे दर्शन घ्यावे. तसे आम्ही लोणंद च्या मैदानात रथा कडे धावा केला, पण याच वेळात Facebook Live काढण्याच्या नादात माझी टीम सोबत ताटातूट झाली..म्हणलं शोधा शोध करण्या आधी थोडं फोटो शूट करूया, मग माझ लक्ष गेलं दिंडी क्र.१५६ मधील वीणा धारी मंडळींकडे. या ग्रुप मध्ये खूप जणांच्या गळ्यात वीणा होत्या, वाटलं फोटो चांगला येईल म्हणून त्यांच्या नकळत एक फोटो घेतला. तो क्लिक कसा आलाय हे चेक करत होतो, इतक्यात कानावर एक दमदार आवाज ऐकू आला…”ओ माऊली असा लांबून फोटो काय काढताय ? आमच्या सोबत तुमचा पण फोटो काढा की, मग बघा कसा ग्वाड इल…”

असा आवाज कोणी दिला हे पाहण्यासाठी माझी नजर लगेच ग्रुप च्या दिशेने भिरकावली….आणि डोळ्यासमोर दिसला एक चैतन्यमय चेहरा…वयामुळे गालावर थोड्या सुरकुत्या, दाट भुवया, पांढऱ्या पण पिळदार जाड मिश्या, डोळ्यात लख्ख तेज…आणि ओठांवर स्मितहास्य…मी त्यांना विचारलं… बाबा मला म्हणालात का ? ते म्हणाले ” हो रे माझ्या पठ्या, तुलाच म्हणलं. तू पण य की फोटोत.” मी लगेच त्यांच्या जवळ जाऊन सेल्फी घेतला…मग त्यांच्या समूहा सोबत पण एक फोटो काढला…

बाबांनी विचारलं ” काय माउली, दिंडी नंबर कोणता ?”. मी त्यांना माझा Social Purpose सांगितला… बाबा खूपच खुश झाले… त्यांनी त्यांच्या सोबत सर्व वीणाधारी मंडळींची ओळख करून दिली…ते म्हणाले आम्ही नेरावागज – बारामती इथून पायी आलोत. तसे तर ते अगदीच निखळ पणाने माझाशी किती तरी वेळ बोलले…त्यांच्या बोलण्यातला साधेपणा फार आपलासा वाटत होता…मग मुद्दामच म्हणालो, बाबा आता थोड्या वेळात मी इथून निघेन पण मला तुम्हाला परत पण भेटायला किंवा बोलायला आवडेल…त्यांनी अगदी सोप्प उत्तर दिलं, चालतंय की आता निघालात तरी पुढच्या वर्षाला भेटू दिंडीतच…आमचा दिंडीचा नंबर लक्षात ठेवा… मी म्हणालो, हो ते तर झालंच पण तुमच्याकडे फोन आहे का ? म्हणजे अधून मधून मी कॉल केला असता… जोरात हसत ते म्हणाले, माझ्या सारख्या म्हाताऱ्याकडं कुठला आलाय रं फोन..पण थांब नंबर हाय.
त्यांनी लगेच सदऱ्याच्या आत हात घालून एक बटवा काढला, त्यातून एक कागदी डायरी बाहेर काढली त्याच्या पहिल्याच पानावरचे दोन नंबर मला नोट करायला सांगितले…केशव आन निलेश ही दोन्ही माझी लेकरं हायती…कर यांना फोन जवापण बोलावंसं वाटल तवा…पण आषाढी च्या नंतर…त्यांनी काय आजून नाय केला फोन दिंडीत आल्या पासून…आणि मी पण घेत नसतोय बघ लोड फोन का नाही येत म्हणून…खोटं हसू तोंडावर आणत ते म्हणाले…करशील नव्ह तू मला फोन !… कसलाच विचार न करता मी बाबांना मिठी मारून कवटाळलं…आणि म्हणालो फोनचं काय घेऊन बसलाय, एक दिवस जेवायला येतो का नाय ते बघा..

आत्ता त्यांचा निरोप घेण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता, मी म्हणालो बाबा गावाला आलो तर तुम्हाला शोधायला नाव तर लागेल, इतका वेळ बोललो आपण, पण नाव काही माहीतच नाही…माझं नाव विजय… तुमचं ? आणि बाबा बोलले ” विठ्ठल ” व्हय बरोबर ऐकलंस ” विठ्ठल ढेकाने “… मी लगेचच उद्गारलो बाबा बघा पादुकांचे दर्शना आधीच मला विठ्ठल सापडले…बाबा परत हसतच म्हणाले, फक्त विठ्ठलच नाही तर मगाशी तो फोन नंबर लिहताना तुझा कागद ज्यांच्या पाठीवर ठेवलेला त्यो आमचा ज्ञानेश्वर… मी निशब्द होऊन त्यांच्या पाया पडलो आणि मग Regroup होण्याच्या दिशेने पुढे पाऊलं टाकली पण लगेच तोच आवाज परत ऐकू आला…”ये पठ्या, आर थांब”. बाबा स्वतः दोन पाऊले पुढे आले, त्याच बटव्यातून एक माचीसची पेठी काढली त्यात एकच पेढा होता…त्यातला नखाने काढून कणभर प्रसाद माझा तळहातावर ठेवला आणि म्हणाले ” माउलींचा मंदिरातला प्रसाद हाय,वाटलं तुझ्या मुखात जावा म्हणून थांबवलं.” मग म्हणाले जा नायतर उशिर हुईल तूला…

माझे पाय आता तिथेच घुटमळत होते…म्हटलं निघण्या आधी थोडं वातारण विनोदी करावं.. म्हणून बाबांना म्हणालो व्हिडिओ काढतोय, मिश्यांवर ताव द्या जरा…आणि बाबांनी त्यांचा बटवा सदऱ्याच्या वरच्या खिशात कोंबत ज्ञानेश्वर आजोबांकडे चेष्टेची नजर देऊन जे काही मिशांना पीळ मारला.. हा हा..त्याला काही तोडच नाही..(तोच व्हिडिओ अपलोड केलाय)

वारीच्या माध्यमातून पण जोडले गेलो की राव..

“Again feel happy happy wali feeling.😇 “

3 thoughts on “विठ्ठल विठ्ठल

 1. विजय भावा,
  फार छान प्रसंग share केला आहेस. खूप मस्त अनुभव सांगितलास. दुसरा तिसरा कोणी असता तर photo काढून निमूटपणे निघूनही गेला असता. Photo नंतर ४-५ लोकांत मिरवून मग delete पण झाला असता. . . . . पण तू अनोखा आहेस भावा . . . . तुझा व्यक्तिमत्व चुंबकीय आहे रे. . . . उगाच नाही त्या विठ्ठल बाबांना आपणहून तुझ्याशी बोलावसं वाटलं . . . निमीत्त काहीही असो पण बाबांना तुझ्याबद्दल आपलेपणा वाटला हे खरं . . .ते पण कधीही साधी तोंडओळखही नसताना. . . फार आपलेपणानी त्यांनी तुला त्याचं शल्यं थोडक्यात सांगितलं त्यांच्या मुलांनी बराच वेळेपासून त्यांना संपर्क केलेला नाही ह्याचं. . . आणि तू त्यांना call करण्याची अपेक्षा व्यक्त करणं स्वाभाविकच होत….कारण कोणालाही तुझ्यासोबत पुन्हा पुन्हा बोलावसं वाटतच रे भावा.
  कौनसी चक्की का आटा खाते हो जर बताओ ना . . . कहांसे लातेहो हो ऐसा स्वभाव ये energy. . . .
  विजय तुसी great हो!!!!

 2. एखाद्या अनोळखी माणसाला आपलंस करणं, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हा स्वभाव तुमचा खूप छान आहे. पण त्या जोडलेल्या नात्यांना कसा जपावं हे तुमच्या कडून शिकलं पाहिजे…

 3. कुठल्या लेखापासून सुरू करू कळत नव्हत , सगळेच विषय एकदम हाका मारून मारून बोलवत होते. नुकतीच तुळशी बागेतून आलेली , तिथे जशी काही मंडळी बोलावतात तसे बोलवत होते पण लक्ष वेधले त्या ह्या माउलीने.
  खास करून पिळदार मिश्या , आजकाल पहायला नाही मिळत. माझ्या स्वप्नातल्या राज्कूमाराला सुद्धा पिळदार मिश्याना ताव देताना पाहते मी. त्यात बाबांच्या मिश्या म्हणजे वाह आज्जींची हरकत नसेल तर ह्या वेळेस 156 नंबर ला जावून प्रपोज मारावच म्हणते.
  असो , मूळ विषयावर येऊ. विठ्ठल विठ्ठल नामाची गोडिच निराळी आहे. त्यात दिंडी म्हणले कि भक्तांचा मेळाच. जुन्या चित्रपटात एक गाण आहे , ” धरिला पंढरीचा चोर ” तुम्ही देखील भेटल्या नंतर मित्रांनी ” धरिला साताऱ्याचा चोर ” वगेरे गाणे म्हणले असावे.
  आज आपण सुद्धा या तांत्रिक युगाच्या गर्दीत अडकलो आहोत . कधीकधी एकाच घरात राहून हरवल्याचा भास होतो.
  आपल्याच माणसाला आपण सापडत नाहीत. मग अश्या वेळी चिंतन , मनन करण्याची गरज पडते आणि आपण मूळ पदावर येतो. तसेच काहीसे इथे घडले आहे.
  गर्दीत सुटलेला तो हात पुन्हा हातात आल्यानंतरचा आनंद जगावेगळा आहे.
  खूप छान अनुभव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top