My Stories

टोचण

परवा तूमच्या मुलांना स्वातंत्र्यवीर सैनिक बनवून पाठवा. म्हणजेच तश्या वेशभूषेत पाठवा असे लिहलेला शाळेच्या दैनंदिनीतला मजकूर वाचला. (अर्थातच तो इंग्रजीत लिहलेला) स्वातंत्र्यदिना निमित्त वेषभूशा स्पर्धेचे नियोजन माझ्या बाळाच्या शाळेत केलेले…फॅन्सी ड्रेसचे दुकानं शोधण्याची आत्ता पालक म्हणून माझी ही पहिलीच वेळ…मग काय…सुरु झाली माझी शोधमोहीम बाळ आणि बायकोसोबत. स्कुटी वरून आम्ही घणसोलीतुन थेट कोपरखैराने मार्केट गाठले. विचार केला लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानात विचारपूस करावी, आम्ही तिघेही गाडी फूटपाथ जवळ लावून दुकानात गेलो, तिथे कळाले की फॅन्सी ड्रेस चे दुकानं वाशी सेक्टर ९ ला आहे. त्यांचे आभार मानून परत गाडीकडे निघालो. ज्या जागी गाडी पार्क केली होती तिथे आता गाडी दिसत नव्हती. थोडे इकडे तिकडे पहिले तर त्या फूटपाथ लगत खडू ने लिहलेला नंबर दिसला. डोक्याला हात लावून हसतच म्हणालो, OMG…बायको टोचण लागली…निशू खूप टेन्शन मध्ये येऊन म्हणाली…हसताय काय आपली गाडी नाहीये इथे…तिला म्हणलं काळजी नको करूस मी येतो गाडी घेऊन, तू जा ऑटो करून KK ( कोपरखैराने जे की माझ्या बायकोच माहेर आहे )

पुढच्या दहा मिनटात मी जवळच्या आर.टी.ओ बीट वर पोहोचलो…आतमध्ये जाताच उजव्या बाजूला पहिलीच माझी ‘रुही’ ( स्कुटी ) उभी दिसली. डावी कडे छोटंसं ऑफिस, त्यात दोन ऑफिसर आणि त्यांच्यासमोर माझ्यासारखे गाडीच्या विरहातून दुःखी माणसांची गर्दी घोंगावत होती. तसं तर शुल्लक दंड देऊन मला माझी गाडी तिथून सोडवता आली असती पण “खाज” (माणसं जोडायची)…हो या नंतर मी जे काही कृत्य केलं त्याला सामान्य भाषेत खाजचं म्हणल जात…मला इथेही माणसं जोडायची चालून आलेली संधी दिसत होती…मी डायरेक्ट स्कुटी जवळ गेलो तिला चावी लावली. त्या दोन्ही ऑफिसर पैकी एक जण मला टक लावून पाहत होते आणि मलाही तेच हवे होते, वाटलं आत्ता हाक मारतील ते मला, पण कानावर काही आवाज पडेना. मग मी तिला साईड स्टॅन्ड वरून काढायचा प्रयत्न केला आणि तोच कानावर अपेक्षित असा आवाज आला..

ऑफिसर : ये बाजीराव सिंघम… इकडे ये..
काय हिरो आम्ही काय इथे पाखरं हाकायला बसलोय…अशीच गाडी घेऊन चाललास ते?
मी : (त्यांच्या जवळ जाऊन ) नाही साहेब गाडी बघत होतो.
ऑफिसर : असं असं..मग चावी कशाला लावलेलीस?
मी : निशब्द
ऑफिसर : ड्युटी आजच जॉईन नाही केली, रहा बाजूला उभा इथे..

तिथे आधी दोघे जण उभे होते त्यातल्या एकाची पावती बनवायचं काम चालू होते..तर दुसरा मुलगा साहेब दोन मिनटं द्या बोलून बाजूला आला आणि त्याने कोणाला तरी फोन लावला आणि ऑफिसच्या बाहेर गेला, तेवढ्या वेळात त्या ऑफिसरने मला नाव विचारलं, मी त्यांच्या छातीवर असलेल्या छोट्या पट्टीवरच नाव वाचत उत्तर दिलं.. आव्हाड साहेब माझं नाव विजय माने.. हसतच ते म्हणाले, व्वा स्मार्ट…नाव वाचलंस माझं…चल लायसन्स दे…मी म्हणालो साहेब ते बायकोकडे आहे, माझी बायको आणि मुलगा तिथेच आहेत जिथे गाडी टोईंग केलीत तुम्ही…मग विदाऊट लायसन्स चा दंड भर..तितक्यात मगाशी बाहेर गेलेला मुलगा आत आला त्याने हातातला मोबाईल आव्हाडांकडे पुढे करत म्हणाला…घ्या बोला, साहेब आहेत. त्यांनी फोन घेतला आणि दुसऱ्या ऑफिसरला म्हणाले अजून एका साहेबांचा फोन…मला लक्षात आलं होतं की हा कोणत्यातरी राजकीय व्यक्ती चा शिफारस कॉल असणार. अगदी शांतपणे त्यांनी पुढच्याच बोलणं ऐकून घेतलं आणि सोजवळ भाषेत म्हणाले, ते सगळं बरोबर आहे हो, पण गाडी नो पार्किंग मध्ये उभी होती आणि गाडीचा फोटो पण आहे तसा, तेव्हा फाईन भरावा लागेल साहेब…आणि त्यांनी फोन परत केला.
मग त्यांनी मोर्चा माझ्याकडे वळवला…ते म्हणाले, लायसन्स घेऊन कोणी येतंय की विदाऊट लायसन्सचा फाईन भरायचा आहे तुला…मी म्हणालो दोन मिनटं द्या.. निशूला मॅसेज टाकला आर.टी.ओ. बीट वर लायसन्स घेऊन ये नाही तर बाबांना पाठव ते घेऊन..
सापाच्या शेपटावर पाय दिला तर तो चावणार हे माहित असताना सुद्धा मी तो देण्याचा प्रयत्न करू पाहिला, म्हणजे माझी पण थोडीफार राजकीय ओळख आहे, मुद्दामच एक फोन लावला..घडला प्रकार त्या व्यक्तीला सांगितला..मग ऑफिसर साहेबांसमोर जाऊन शिफारशीच्या फोनचा हात मी पण पुढे केला…त्यांनी तेच मिश्किल हास्य चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाले अजून एक फोन.. मग तिकडून जे काही बोलणे झाले ते ऐकून झाल्यावर त्यांनी रिप्लाय केला साहेब मी तुम्हाला व्यक्तीगत ओळखतो, पण तुमच्या या माणसाने आमच्या बीटमध्ये येऊन आमच्या परवानगी शिवाय गाडी काढण्याचा प्रयत्न केलाय…त्याच काय ! त्यामुळे याला दंड तर भरावाच लागेल.. मग फोन मला परत केला…थोडंसं रागावून म्हणाले मगाशी बायको पोराचं नाव घेतलंस म्हणून माणुसकी दाखवली..पण आत्ता मात्र हिरो तूला सुट्टी नाही…त्यांचं रागावणं स्वाभाविक आणि अपेक्षित होतं..पण मला त्यांचा अजिबातच राग येत नव्हता..उलट बरं वाटतं होतं एका इमानदार ऑफिसरच्या नजरेत पाहताना..मी तसाच त्यांचं काम शांत उभा राहून पाहत होतो..

थोड्या वेळाने मी साहेबांना विनंती केली मला दोन मिनिट बोलायचंय…माणूस बाहेरून जितका सख्त दिसतो ना तो आतून तितकाच प्रेमळ असतो हे माझं वयक्तिक मत आहे…आणि आव्हाड साहेबांच्या बाबतीत ते अगदीच तंतोतंत खरं ठरलं… ते माझ्या सोबत बाहेर आले, मला म्हणाले बोल..काय चालय तूझं मागासपासून… मी म्हणालो पहिल तर साहेब sorry…माझं चुकलं…कारण कळत नकळत माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला…पण त्रास द्यायचा असा काही उद्देश नव्हता..
परत ते म्हणाले आत्ता बोलशील का मुद्द्याचं…मी म्हणालो, खरं तर तो फोन शिफारशी साठी नव्हता.. तुम्ही या आधीचा त्या मुलाने दिलेला फोन किती शान्त पणे हॅन्डल केला…तेव्हाच तुमच्या काम करण्याच्या शैलीचा मी फॅन झालो…खरं तर मी बायकोला बोलावलंय लायसन्स घेऊन…पण मला बघायचं होतं तुम्ही माझ्या शिफारसीचा कॉल पण कसा हाताळताय ते…आणि तोही तुम्ही किती मस्त हाताळलात..
साहेब जाम भारी काम करताय तुम्ही..एक तर तुमचं काम हे असं खडतर ऊन..वारा..पाऊसात सामोरे जाऊन करायचे..मग गाडी घेऊन आलेला माणूस आधीच रागावलेल्या मनस्थितीत असतो त्यात मध्ये मध्ये असे राजकीय किंवा इतर क्षेत्रातल्यांचे तुमच्या कामात होतं असणारे हस्तक्षेप आणि या सगळ्यातून हसतमुखाने प्रामाणिक पणे तुम्ही जी ड्युटी निभवताय ना…अजिबातच सोपं नाही हे…खूप ग्रेट आहात तुम्ही..
ते म्हणाले बस बस..म्हणालास इतकं पुरे..त्यात ग्रेट वगैरे काही नाही, हे तर माझ कामचं..


मग ओळख झाली म्हणून त्यांनी माझ्या गावचे नाव विचारले…आणि अगदीच कुठे राहतो वगैरे वगैरे आमचे बोलणे सुरु झाले..तितक्यात बायको लायसन्स घेऊन आली…मी लगेच तिची ओळख त्यांना करून दिली, निशूला माझा माणसं जोडायचा छंद चांगलाच माहित आहे..
ती लगेच म्हणाली तुम्ही इथे पण ओळख काढलीत…तेव्हा आम्ही तिघेही एकदम हसलो..
साहेब बायकोला म्हणाले नव्हरा तुमचा जाम वेडा माणूस आहे…निशू साठी माझ्या वेडेपणा बद्द्ल काही वेगळे सांगायला नको..
मग मला म्हणाले माणसं जोडायला कोणी असं काही करत का रे!
मी हसतच म्हणालो सॉरी थोडा वेडेपणा तर आहेच, पण या वेडेपणतूनच ओळख झाली बघा आपली…

मग विथ लायसन्स वाला फाईन मी रीतसर भरुन गाडी ताब्यात घेतली आणि आव्हाड साहेबांचा निरोप घेतला..निघताना त्यांच्यासोबत एक सेल्फी घेतला त्यांनी पण आपुलकीनं त्यांचा नंबर मला दिला…हसतच म्हणालो शिफारशी चा कॉल नाही करणार बरे का मी या तुमच्या नंबर वर..

तुम्हाला सांगायला खूप बरे वाटते की या प्रसंगाला आठवडा उलटून गेलाय, पण एक दिवस आड का होईना आम्ही व्हाट्सअप माध्यमातून एकमेकांशी बोलतोय..१५ ऑगस्ट ला मी रित्विक ला स्वातंत्रवीर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पोशाख घातलेला, तो फोटो आव्हाड साहेबांना पाठवला त्यांनी लगेच त्यांच्या मुलाचा पोलिस गणवेशातला फोटो मला पाठवला..आणि हे बोलणे भेटणे आत्ता नक्की असेच पुढेही चालू राहील याची मला पूर्ण खात्री आहे…

टोचण च्या माध्यमातून पण जोडले गेलो की राव..

“Again feel happy wali feeling.😇”

One thought on “टोचण

  1. विजय, मस्तचं यार…..
    पण वेडेपणा जरा संभाळूनच करत जा, तू चांगला वेडा आहेस, चक्रम वेड्यांबरोबर गाठ पडली तर . . . .
    पण तरीपण छान, माणसे जोडत राहा अशीच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top